विनोदी स्वभावाने सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असतो. तो नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट आणि फोटो शेअर करत असतो. काही पोस्टच्या कॅप्शन्स हे लक्ष वेधून घेणाऱ्या असतात. तर काही पोस्ट भावूकही करतात. आपल्या विनोदी शैलीने कुशलने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. कुशलची बायको सुनयना नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत गेली आहे. याच दरम्यान कुशलला आता आपल्या बायकोची खूप आठवण येत आहे.
अभिनेता आपल्या पत्नीच्या आठवणीत भावूक झाला आहे. एक खास फोटो शेअर करत त्याने पत्नीसाठी पोस्ट केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कुशलने स्पेशल फोटो शेअर केला आहे. यामध्ये "मैं हर “वक़्त” बस तुम्हें देखना चाहता हूँ" म्हणजेच मी प्रत्येक वेळी फक्त तुला पाहू इच्छितो असं म्हटलं आहे. कुशलच्या हातात घड्याळ असून त्यावर बायकोचा फोटो पाहायला मिळत आहे. त्याने घडाळ्याच्या वॉलपेपरवर सुनयनाचा फोटो ठेवला आहे.
कुशलची पत्नीसाठीची ही स्पेशल पोस्ट सर्वांचच लक्ष वेधून घेत असून हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुशल बद्रिकेची बायको सुनयना 'मुघल ए आजम' या महानाट्यात काम करत आहे. सुनयनाने कथ्थकचे प्रशिक्षण घेतलं आहे. नाटकाचे प्रयोग आता अमेरिकेत होत असल्याने सुनयनाही अमेरिकेला गेली आहे. 'मुघल ए आजम' हे संगीतमय नाटक आहे. फिरोज अब्बास यांनी नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे.