Lalit Prabhakr: बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत सध्या इमरान हाश्मी (Emraan Hashmi) स्टारर 'ग्राउंड झिरो' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ग्राउंड झिरो मध्ये इमरान हाश्मीसोबत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. परंतु सई ताम्हणकरसोबत आणखी एक मराठी अभिनेता या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर आहे. त्यामुळे चाहते प्रचंड उत्सुक आहे. दरम्यान, ग्राउंड झिरो चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.
नुकतीच ललित प्रभाकरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे त्याने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. ललितने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलंय, माझा पहिला हिंदी चित्रपट. या पदार्पणाचा खूप आनंद होत आहे. या संधीसाठी @excelmovies चे खूप खूप आभार आणि सतत प्रयत्नांसाठी @dcatalent चे सुद्धा मनापासून आभार. दिग्दर्शक @tejasdeoskar यांच्यासोबत काम करुन छान वाटलं..." अशा आशयाची पोस्ट त्याने लिहिली आहे. अभिनेत्याची ही पोस्ट पाहून त्याचे चाहते प्रचंड खुश झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ग्राउंड झिरो सिनेमात इमरान हाश्मीने एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर सई ताम्हणकर सिनेमात बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांच्या पत्नीची भूमिका साकारत असून, ललित त्यांच्या सहकाऱ्याच्या भूमिकेत आहे. २००१ मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सिक्रेट मिशनवर हा सिनेमा आधारित आहे. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.