लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे (hemant dhome) याच्या 'झिम्मा' (Jhimma) या चित्रपटाने मराठी प्रेक्षकवर्गाला अक्षरश: वेड लावलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन १ वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, त्याची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. यामध्येच आता हेमंतचा सनी हा नवा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर (lalit prabhakar) मुख्य भूमिका साकारणार आहे.
सध्या सोशल मीडियावर ललितच्या 'सनी' या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. येत्या १८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ललित, सनी ही मध्यवर्ती धूमिका साकारत आहे. त्यामुळे त्याच्या या भूमिकेविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.
'झिम्मा'ला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर प्रेक्षकांशी एक वेगळं नातं तयार झालंय आणि त्या आपुलकीच्या नात्यानेच आम्ही जबाबदारीने ‘सनी' हा सिनेमा घेऊन आलोय. आपल्या आयुष्याबद्दल चांगलं वाटायला लावणारी ही कथा प्रेक्षकांसमोर आणताना प्रचंड आनंद होतोय. प्रेक्षकांनी ज्याप्रमाणे 'झिम्मा'ला प्रेम दिले तसेच ते 'सनी'ला हि मिळेल अशी खात्री आहे, असं हेमंत म्हणाला.
दरम्यान, हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी यांनी केली आहे. तसंच क्रेझी फ्यु फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत चलचित्र कंपनीअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.