Join us

या आहेत महेश कोठारे यांच्या पत्नी... असे ठरले होते त्यांचे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 4:36 PM

महेश कोठारे आणि निलिमा  कोठारे यांचे लग्न कसे जमले याविषयी त्यांनीच काही वर्षांपूर्वी एका मालिकेत सांगितले होते.

ठळक मुद्देनिलिमा देसाई यांच्या कुटुंबियांचा अभिनयक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. त्यांचे वडील हे डॉक्टर होते. निलिमा आणि महेश यांचे अरेंज्ड मॅरेज झाले असून त्या दोघांनी काहीच भेटीत लग्नाचा निर्णय घेतला होता.

महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांनी एक अभिनेता, दिग्दर्शक म्हणून मराठीमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलगा आदिनाथने देखील अभिनयसृष्टीत नाव कमावले आहे. महेश कोठारे कधीही कोणत्या समारंभात, पार्टीत आपल्या कुटुंबासोबतच दिसतात. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी निलीमा, मुलगा आदिनाथ आणि सून उर्मिला कोठारे आवर्जून असतात. 

महेश कोठारे यांच्या पत्नी निलिमा या प्रसिद्ध कॉश्च्युम डिझायनर असून पछाडलेला या चित्रपटापासून त्यांनी या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. त्यांनी जय मल्हार या मालिकेतील व्यक्तिरेखांसाठी देखील कॉश्च्युम डिझाईन केले होते. त्यांच्या या कामाची चांगलीच चर्चा झाली होती. महेश कोठारे आणि निलिमा  कोठारे यांचे लग्न कसे जमले याविषयी त्यांनीच काही वर्षांपूर्वी एका मालिकेत सांगितले होते. झी मराठीवरील पसंत आहे मुलगी या मालिकेचया प्रमोशनच्या निमित्ताने त्यांनी त्यांची प्रेमकथा कशी फुलली होती हे सांगितले होते. 

निलिमा देसाई यांच्या कुटुंबियांचा अभिनयक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. त्यांचे वडील हे डॉक्टर होते. निलिमा आणि महेश यांचे अरेंज्ड मॅरेज झाले असून त्या दोघांनी काहीच भेटीत लग्नाचा निर्णय घेतला होता. महेश यांनी राजा और रंक, छोटा जवान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये बालपणी काम केले होते. त्यानंतर त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर ते पुन्हा एकदा अभिनयाकडे वळले. पण त्यांचा प्रीत तुझी माझी हा चित्रपट फ्लॉप झाला. 

मराठीत चांगली भूमिका मिळत नसल्याने त्यांनी दरम्यानच्या काळात अनेक गुजराती, राजस्थानी चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांना म्हणावे तितके अभिनयक्षेत्रात यश मिळत नव्हते. त्याच दरम्यान त्यांचे निलीमा यांच्यासोबत लग्न झाले.

त्यांच्या पत्नीचा पायगुणामुळे लग्नानंतर काहीच महिन्यात त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळाले. धुमधडाका या चित्रपटानंतर तर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्यांच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. 

टॅग्स :महेश कोठारेआदिनाथ कोठारेउर्मिला कानेटकर कोठारे