‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील राणी येसूबाईंच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओत प्राजक्ता माईकवर बोलता बोलता अचानक रडताना दिसतेय. माईकसमोर तोंडातून शब्द फुटण्याऐवजी तिच्या डोळ्यांतून अश्रूंधारा वाहू लागल्या. आजोबांच्या आठवणीत प्राजक्ताला अश्रू अनावर झालेत. गेल्यावर्षी प्राजक्ताच्या आजोबांचं निधन झालं. आजोबांच्या निधनाच्या दु:खातून प्राजक्ता अद्यापही सावरू शकलेली नाही. आजोबा आपल्यासोबत नाहीत, हे अजूनही तिला खरं वाटत नाहीये.
प्राजक्ताने एका कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत भावुक कॅप्शनही. यात ती लिहिते, "आज आजोबांचं प्रथम पुण्यस्मरण...वर्षश्राद्ध... आज पहिल्यांदाच माईकसमोर तोंडातून शब्द फुटण्याऐवजी डोळ्यातून पाणी येत होतं...कारण अजूनही खरं वाटत नाही की आजोबा आपल्यामध्ये नाही. ज्यांनी आयुष्यभर पांडुरंगाची सेवा केली, आमच्यावर धार्मिक, अध्यात्मिक संस्कार केले. ते कायमच आमचे आधारस्तंभ राहतील. आज वर्ष झालं तरी सगळ्यांच्या डोळ्यात, मनात तुमच्या आठवणी कायम आहेत आजोबा...तुम्हाला आदरपूर्वक श्रद्धांजली.. आज जयश्रीताई तिकांडे यांचं किर्तन ठेवलं होतं... अगदी सरळ, साध्या पण मार्मिक शब्दांत ताईंनी किर्तन केलं. ताई तुमचे मनापासून आभार. तुमचे किर्तन ऐकून कान अगदी तृप्त झाले..."
प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तिचं सांत्वन केलं आहे, धीर दिला आहे. तर काहींनी तिचं कौतुक केलं आहे. मी तर पहिल्यांदाच पाहिलंय की कोणत्या सिने अभिनेत्रीने आपल्या घरी कीर्तन ठेवलं, अशी कमेंट एका युजरने केली आहे. अशाच कायम राहा, असं एका युजरने म्हटलं आहे.
प्राजक्ता सध्या डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत शिवपुत्र संभाजी नाटकात काम करतेय. सध्या या नाटकाचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. प्राजक्ताने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत येसूबाईची भूमिका साकारली होती. त्यासोबतच तिने नांदा सौख्यभरे, संत तुकाराम या मालिकेत काम केलेय. सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत होती. पण काही वादांमुळे तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले.