Join us

'गाजावाजा का करायचा?' पुरंदरेंना श्रद्धांजली न वाहिल्यावरुन प्रश्न विचारणाऱ्याला प्रशांत दामलेंचं थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 7:43 PM

अभिनेता प्रशांत दामले यांनी पुरंदरेंना श्रद्धांजली न वाहता त्याच दिवशी त्यांच्या नाटकाच्या दौऱ्याची पोस्ट शेअर केली. त्यांची ही पोस्ट पाहिल्यांनंतर अनेकांनी संताप व्यक्त करत प्रशांत दामले यांना ट्रोल केलं.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं नुकतंच अल्पशा आजाराने निधन झालं. १४ ऑगस्टला १०० व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या पुरंदरेंनी पुण्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून सामान्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यात मराठी कलाविश्वातील काही सेलिब्रिटींनीही सोशल मीडियाचा आधार घेत पुरंदरेंना आदरांजली अर्पण केली. मात्र, अभिनेता प्रशांत दामले यांनी पुरंदरेंना श्रद्धांजली न वाहता त्यांच्या नाटकाच्या दौऱ्याची पोस्ट शेअर केली. त्यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत प्रशांत दामले यांना ट्रोल केलं. मात्र या ट्रोलर्सला प्रशांत दामले यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. "सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली तरच एखाद्या व्यक्तीबद्दल आदर असतो?", असा सवालही त्यांनी ट्रोलर्सला विचारला आहे.

१५ नोव्हेंबरला प्रशांत दामले यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एका लग्नाची पुढची गोष्ट या त्यांच्या नाटकाच्या दौऱ्याची पोस्ट शेअर केली होती. “आज रात्री कोल्हापूर, उद्या कऱ्हाड, परवा सांगली. निघालोय मुंबईहून,” अशी पोस्ट दामले यांनी शेअर केली होती. त्यांची ही पोस्ट पाहिल्यावर अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं.

बाबासाहेब पुरंदरेंचं निधन झालं आहे, तुम्हाला श्रद्धांजली देण्यासाठी वेळ नाही का?,” असा प्रश्न एका नेटकऱ्याने प्रशांत दामले यांना टॅग करत विचारला. विशेष म्हणजे प्रशांत दामले यांनी या प्रश्नाची दखल घेत सडेतोड शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

“सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली तरच एखाद्या व्यक्तीबद्दल आदर असतो असं काही नाही. बाबासाहेब आम्हा कलाकारांच्या हृदयात आहे आणि राहतील. त्याचा गाजावाजा का करायचा?,” असं प्रत्युत्तर प्रशांत दामले यांनी दिलं.

दरम्यान, प्रशांत दामले यांचं हे उत्तर पाहिल्यावर अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या या कमेंटला जवळपास १२०० पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील उद्धटपणे प्रश्न विचारणाऱ्यांना प्रशांत दामले यांनी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.

टॅग्स :प्रशांत दामलेबाबासाहेब पुरंदरेसेलिब्रिटी