Join us

"आम्हाला थिएटर्ससाठी भीका मागाव्या लागतात" पुष्कर जोग स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 9:09 AM

पुष्कर जोग 'बापमाणूस' सिनेमामुळे चर्चेत आहे.

सध्या मराठी सिनेमांची चलती आहे. 'वेड', झिम्मा', 'वाळवी', 'बाईपण भारी देवा' या सिनेमांनी तुफान यश मिळवलं. मात्र मराठी सिनेमांना स्क्रीन्स मिळत नाहीत ही तक्रार आजही कायम आहे. भाऊराव कऱ्हाडेंच्या 'टीडीएम' सिनेमाचं उदाहरण ताजं आहे. या सिनेमातील कलाकार थिएटरमध्ये अक्षरश: रडले. आता नुकतंच अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोगनेही (Pushkar Jog) मराठी सिनेमांच्या परिस्थितीविषयी थेट भाष्य केलं आहे.

पुष्कर जोग 'बापमाणूस' सिनेमामुळे चर्चेत आहे. वडील आणि मुलीच्या नात्यावर सिनेमा आधारित आहे. प्रेक्षकांना सिनेमा खूपच भावलाय. अभिनेता पुष्कर जोगने प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतीत मराठी सिनेमांच्या एकंदर परिस्थितीवर भाष्य केलं. तो म्हणाला,'हे खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्रात असून मराठी सिनेमांना थिएटर्ससाठी भीका मागाव्या लागतात. तसंच आपले राजकारणी, सांस्कृतिक खातं बघणारे मंत्री यांनी याकडे लक्ष द्यावं. यावर एकच उपाय आहे सर्व निर्मात्यांनी एकत्रित येऊन एकता दाखवली तरच हे होईल.'

पुष्कर जोगने याआधी त्याच्या 'व्हिक्टोरिया' सिनेमावेळीही भाष्य केलं होतं. थिएटर्स मिळत नाहीत म्हणून त्याला सिनेमा पुढे ढकलावा लागला होता. निर्मात्यांचं किती नुकसान होतं हे सुद्धा त्याने बोलून दाखवलं होतं.  'बापमाणूस' सिनेमा नुकताच रिलीज झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. यामध्ये केया या चिमुकलीने भूमिका साकारली आहे. तसंच अनुषा दांडेकरही मुख्य भूमिकेत आहे.

टॅग्स :पुष्कर जोगमराठी अभिनेतामराठी चित्रपटनाटक