मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि गुणी कलाकार म्हणजे सचिन खेडेकर (sachin khedekar). नाटक, चित्रपट, रिअॅलिटी शो अशा विविध माध्यमातून सचिन खेडेकर यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि गुजराती या भाषांमध्येही त्यांनी काम केल्याचं सांगण्यात येतं. एकेकाळी छोटा पडदा गाजवणाऱ्या सचिन खेडेकर यांनी मालिकाविश्वाकडे पाठ फिरवली आहे. याविषयी अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मालिकांमध्ये काम न करण्यामागचं कारण सांगितलं आहे.
"पूर्वी मी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करायचो त्यावेळी आठवड्याला एक भाग असं मालिकांचं प्रसारण व्हायचं. मात्र, आता डेली सोप्सच्या काळात दररोज मालिकेचा एक भाग प्रसारित होतो. अर्थात, याला काही मर्यादा आहेत. आता जर या मालिका दररोज पाहणाऱ्या प्रेक्षकाचा एखाद्या महिन्याचा चुकला तरी सुद्धा या मालिकांमध्ये फार काही विशेष घडलं नसतं", असं सचिन खेडेकर म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "थोडक्यात काय तर, एखाद्या मोठ्या शेफला बरेच चांगले पदार्थ येत असताना 'तू फक्त रोज वरणभातच कर.' असं सांगण्यासारखा हा प्रकार आहे. त्यामुळेच मी आजकालच्या मालिकांमध्ये काम करणे थांबवले."
दरम्यान, सचिन खेडेकर यांनी कोकणस्थ, काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आईचा घो यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच इम्तिहान, सैलाब, थोडा हे थोडे कि जरूरत हे, टिचर, चाळ नावाची वाचाळ वस्ती या मालिकांमध्ये काम केलं आहे.