सचिन पिळगावकर-अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या त्रिकूटाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे सिनेमे दिले. या तिघांचे सिनेमे आजही आवडीने पाहिले जातात. या तिघांपैकी लक्ष्मीकांत बेर्डेंनी काही वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला. सिनेमावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला लक्ष्याची हटकून आठवण आल्याशिवाय राहत नाही. अशातच लक्ष्यासोबत काम केलेले सचिन पिळगावकर यांनी अभिनेत्याची एक भावुक आठवण सांगितली आहे.
लक्ष्याची ती गोष्ट आयुष्यभर लक्षात राहिली
माझा कट्टाला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर लक्ष्मीकांत बेर्डेंविषयी म्हणाले की, "लक्ष्या बडे दिलवाला आदमी होता. तो दिलदार होता. प्रायोगिक रंगभूमीमध्ये काही लोक कार्यरत होते. लक्ष्याचे अनेक मित्र या रंगभूमीवर कार्यरत होते. कारण तो सुद्धा तळागाळातून वर आलेला होता. लक्ष्या अनेकदा त्यांची नाटकं बघायला जायचा. नाटक संपल्यावर तो विचारायचा, किती पैसे कमी पडले. तेव्हा समोरचा म्हणायचा ४०० कमी पडले. मग लक्ष्या ५०० ची नोट काढून द्यायचा. तो म्हणायचा की, "हे घे. चालू ठेव नाटक." पोरांनी नाटक बंद करता कामा नये. चालू ठेवलं पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं."
सचिन पिळगावकर लक्ष्याविषयी पुढे म्हणाले की, "आंब्याचा सीझन असेल तर लक्ष्या शूटींगच्या सेटवर सर्वांना स्वतःच्या हाताने आंबे कापून वाटायचा. आंबे कापायला त्याला प्रचंड आवडायचं. खूप सुरेख आंबे कापायचा तो. सर्वांना फोडी वाटताना कधीकधी त्याला मिळायचं नाही. या उदाहरणांवरुन लक्षात येईल की तो, काय माणूस होता!" अशाप्रकारे सचिन पिळगावकर यांनी लक्ष्याचं कौतुक केलं.