Join us

'भाई'च्या शूटिंगवेळीच हार्टॲटॅक आला तेव्हा... सागर देशमुखने सांगितला 'तो' कठीण प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 09:37 IST

मराठी लेखक, अभिनेता सागर देशमुख कलर्स मराठीवरील नव्या 'सुख कळले' या मालिकेत झळकणार आहे. यामध्ये त्याची आणि स्पृहा जोशीची फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे.

मराठी लेखक, अभिनेता सागर देशमुख (Sagar Deshmukh) कलर्स मराठीवरील नव्या 'सुख कळले' या मालिकेत झळकणार आहे. यामध्ये त्याची आणि स्पृहा जोशीची फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. मालिकेचे दोन प्रोमो आतापर्यंत आले असून ते प्रेक्षकांच्या भलतेच पसंतीस पडले आहेत. दरम्यान सागर देशमुखने याआधी पु ल देशपांडे यांच्यावरील 'भाई: व्यक्ती आणि वल्ली' सिनेमात काम केलं आहे. सिनेमादरम्यानचा एक कठीण प्रसंग त्याने नुकताच मुलाखतीत सांगितला.

'भाई:व्यक्ती आणि वल्ली' या सिनेमात सागर देशमुखने पु ल देशपांडेंची भूमिका साकारली. यात त्याचं खूप कौतुकही झालं. सागरच्या खऱ्या आयुष्यातला 'सुख कळले' असा प्रसंग नेमका कधी आला होता याविषयी नुकतंच त्याने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. तो म्हणाला, "ज्यावेळेला आम्ही 'भाई' सिनेमाचं शूटिंग करत होतो, तेव्हा जवळपास ९० टक्के शूट पूर्ण झालं असताना माझ्यावर कठीण प्रसंग आला. मला हृदयविकाराचा झटका आला. माझी अँजिओप्लास्टी झाली. २-३ दिवस मी अतिशय गंभीर होतो. तेव्हा माझी बायको प्राजक्ता, माझ्या आजूबाजूची लोकं मोहित टाकळकर, आशिष मेहता, सारंग साठे, नेहा जोशी, ओंकार कुलकर्णी, पर्ण पेठे, मृण्मयी गोडबोले अशी मी शंभर नावं घेऊ शकतो. ही सगळी लोकं माझ्या आजूबाजूला अशी तटबंदी करुन उभी होती."

तो पुढे म्हणाला, "त्यावेळेला जे मी अनुभवलं, जे प्रेम, सकारात्मक ऊर्जा मिळाली त्यातून मी बाहेर आलो. तेव्हा मला कळलं की माझ्या आयुष्यात पैसा अडका किंवा मटेरियलिस्ट गोष्टींचं सुख ह्यापेक्षा माणसांचं असणं किती महत्वाचं आहे. त्यावेळेला मला नक्की वाटलं की मला सुख कळले. या लोकांमुळे मला अक्षरश: नवीन जन्म मिळाला. म्हणूनच आज मी ही मालिका करु शकतोय, माझ्यातली कला ही आणखी चांगल्या पद्धतीने जोपासू शकतोय. माणूस, आर्टिस्ट म्हणून माझी आणखी प्रगती होत आहे."

सागर देशमुखने याआधी मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. तो नुकताच झी मराठीवरील 'चंद्र विलास' मालिकेत दिसला होता. तर त्याने 'वायझेड', 'मिडियम स्पायसी', 'हंटर', 'गर्लफ्रेंड' या सिनेमांमध्येही काम केलं. 'सुख कळले' ही मालिका २२ एप्रिलपासून कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. 

टॅग्स :सागर देशमुखमराठी चित्रपटहृदयविकाराचा झटकामराठी अभिनेता