सिनेइंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि यशस्वी करिअर घडवण्यासाठी कलाकार शर्थीचे प्रयत्न करत असतात. अनेक कलाकारांना खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही. शेवटी हा ज्याचा त्याचा नशिबाचा भाग...अभिनेता संकेत कोर्लेकरलाही इंडस्ट्रीत नाव मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. पण, त्याने कधीच हार मानली नाही. लहानपणी पाहिलेले अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने प्रयत्नांची परिकाष्ठा केली आणि अजूनही तो स्ट्रगल करत आहे.
संकेतने सिनेसृष्टीतील हा स्ट्रगल पोस्टद्वारे सांगितला आहे. त्याने एक फोटो शेअर करत १० वर्षांचा प्रवास दाखवला आहे. संकेत पोस्टमध्ये म्हणतो, "ह्या अभिनेत्याच्या घराचा तो कोपरा आज तिथून इथपर्यंत पोहोचलाय..😊 2011 ला पहिला चित्रपट नशिबात आला. पण, त्यानंतर ४ वर्ष अनेक ऑडिशन देऊन सुद्धा कोणतीच भूमिका वाट्याला आली नाही. मालिका चित्रपटात काम करणारा एक लहान का असेना पण अभिनेता तर बनायचेच होते. कारण लहानपणीपासून ते आत्तापर्यंत “अभिनेता “ हे एकच स्वप्न उराशी बाळगले आहे. इतर अभिनेत्यांसारखे मुंबईत येऊन खोली घेऊन राहणे आणि मुंबईत फक्त स्ट्रगल करणे हे मला शक्य नव्हते. कारण घरची परिस्थिती मला फक्त रेल्वेच्या तिकिटाला पैसे देऊ शकेल इतकीच होती. त्यातही मी ६० रुपयांचे बजेट घेऊन आठवड्यातून तीन वेळा मुंबईत ऑडिशनसाठी फेऱ्या मारायचो. आज माझे लाखो फॉलोवर्स आहेत. पण, तेव्हा तर कोणत्याच प्रकारचे सोशल मीडिया नव्हते त्यामुळे अजून मेहनत".
"ह्या सगळ्या प्रवासात तेव्हा एक गोष्ट कळली की यशस्वी अभिनेता बनायचे असेल तर 99 % मेहनत आणि 1 % का होईना पण नशीब लागतं आणि त्या वेळेस बहुतेक त्या 1 % चीच माझ्याकडे कमी होती म्हणून अभिनयासोबत ह्याच क्षेत्रातील दुसरे काहीतरी शिकून किमान पोट भरण्यासाठी पैसे कमवूया असे ठरवले. तेव्हा आईच्या कृपेने २०१५ ला लोन काढून आमच्याकडे पहिला 27,500 रूपयाचा Laptop आला आणि मी युट्युब वर एडिटिंग शिकून घरातलाच एक कोपरा शोधून टेबल खुर्ची मांडून त्यावर एडिटिंग ची कामे घेऊ लागलो. दहा वर्षांपूर्वी एडिटिंगच्या जोरावर महिन्याला ८ ते १० हजार रुपये येऊ लागले. ते मी पूर्णपणे मुंबईत येऊन खोली घेऊन Actor बनण्यासाठी खर्च करू लागलो. सुदैवाने नंतर बऱ्याच छान लोकांची साथ मिळाली आणि आज थोडे फार का होईना पण एक अभिनेता म्हणून मला लोक ओळखतात. ह्या वर्षी सुद्धा एक सिरीज आणि एक चित्रपट रिलीज होणार आहे. तरीही ह्या सगळ्यामध्ये आजपर्यंत मी एडिटिंग सुरूच ठेवली पण हे एडिटिंग स्किल आता दुसऱ्यांसाठी नाही. फक्त आपल्या स्वतःच्या सोशल मीडियासाठी आणि सिरीयल किंवा चित्रपटाच्या सेटवर स्वतःच्या व्हिडिओ रिल्स करण्यासाठी वापरतो. कारण, एडिटिंग हे आता माझे पैसे कमवण्याचे साधन नाही", असंही त्याने म्हटलं आहे.
पुढे तो म्हणतो, "मी एडिटिंग आजही सोडले नाही कारण मला आज अभिनेता ह्या एडिटिंगनेच बनवले आहे. 2015 मध्ये जो घराचा कोपरा एडिटिंगसाठी मी सजवला होता तोच कोपरा नवीन Flat मध्ये 2025 ला आज असा दिसतोय. आजही बराच कमी असेल पण जे आहे ते फक्त मेहनतीच्या आणि आशीर्वादांच्या जोरावर आहे बस. नव्याने अभिनय क्षेत्रात येणाऱ्या अभिनेत्यांना गाईड करण्या इतपत मी मोठा नाही पण एवढच सांगेन.. वेळ खूप घेईल तुमच्याकडून पण त्या बदल्यात इतकं देईल की तुम्ही कल्पना देखील केली नसेल".