सयाजी शिंदे (sayaji shinde) हे नाव सध्याच्या घडीला कोणालाही नवीन नाही. एक उत्तम अभिनेता असणाऱ्यासोबतच ते पर्यावरण रक्षक असल्याचंही पाहायला मिळतं. गेल्या कित्येक वर्षांपासून सयाजी शिंदे स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलत आहेत. आतापर्यंत त्यांनी हजारोंच्या संख्येने झाडांची लागवड केली आहे. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते समाजातील प्रत्येक नागरिकाला वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन करत असतात. सध्या सयाजी शिंदे एका १०० वर्ष जुन्या झाडामुळे चर्चेत आले आहेत. पुण्यातील एक जुनं झाड त्यांनी चक्क साताऱ्यात नेऊन त्याचं वृक्षारोपण केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर सयाजी शिंदे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते पुण्यातील १०० वर्ष जुनं झाडं कशाप्रकारे साताऱ्यात नेलं आणि त्याची पुन्हा लागवड केली याची माहिती देतांना दिसत आहेत.
"नमस्कार, आपल्या भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड. काल हडपसरला रस्त्यावर १०० वर्ष जुनं झाडं उन्हात पडलेलं दिसलं. त्यामुळे रातोरात निर्णय घेतला आणि साताऱ्यात तो लावण्याचा निर्णय घेतला. साताऱ्यात जैवविविधता उद्यान करण्यात येत आहे. तेथे आज तो वृक्ष लावण्यात येत आहे", असं सयाजी शिंदे म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "सांगायचा उद्देश एवढाच की १०० वर्ष जुन्या या वडाच्या झाडावर ४०० जीवजंतू जगत असतात. त्यामुळे ते वाचवलेच पाहिजे. पण, नाईलाजाने ते झाड काढावं लागत असेल तर ते दुसरीकडे कुठेतरी लावता येईल याचीही काळजी घेतली पाहिजे."
दरम्यान, हे १०० वर्ष जुनं झालं साताऱ्यातील गोळीबार मैदान येथे पुन्हा लावण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सयाजी शिंदे यांनी या झाडाची पुन्हा लागवड करुन त्याला नवं संजीवनी दिली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.