मराठी कलाकार कोणत्याही बाबतीत कमी नाही हे त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून अनेकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारुन त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मराठीसह बॉलिवूड त्याचबरोबर साउथ इंडस्ट्रीलाही त्यांनी आपल्या टॅलेंटची दखल घ्यायला भाग पाडलं आहे. अभिनेते सयाजी शिंदे ते सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर तसंच श्रुती मराठे, उमेंद्र लिमये यांसारख्या अनेक कलाकारांनी साउथ इंडस्ट्री गाजवली आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने या कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीबद्दल जाणून घेऊया...
१) सयाजी शिंदे-
अभिनेते सयाजी शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. आता हे नाव फक्त मराठीपुरतंच मर्यादित न राहता बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत त्यांनी काम केलं आहे.
दरम्यान, पहिल्याच चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता? याबद्दल एका मुलाखतीमध्ये सयाजी शिंदे यांनी सांगितलं होतं की, "मी पहिलाच चित्रपट तमिळ केला होता त्यावेळी एकदा पॉंडिचेरीला मी पूर्णपणे ब्लॉक झालो होतो कारण समोरचा माणूस काय बोलतोय, हेच मला समजत नव्हतं. पण, काही न समजता पुढे जाण्यापेक्षा समजून घेऊन पुढे गेलेलं केव्हाही चांगलं असतं. अशा पद्धतीने काम करत मी पहिला साऊथ सिनेमा केला." असा खुलासा करत त्यांनी आपल्या पहिल्या चित्रपटात काम केल्याचा अनुभव सांगितला.
२) श्रुती मराठे
अभिनेत्री श्रुती मराठे वेगवेगळे मराठी चित्रपट, मालिका तसेच जाहिरातींमध्ये देखील झळकली आहे. इतकंच नाही तर श्रुतीने तमिळ आणि तेलुगू सिनेमांमध्ये ही काम केलं आहे. अभिनेत्रीने २००९ मध्ये 'इंदिरा विझा' या तमिळ रोमँटिक थ्रिलर चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अलिकडेच श्रुती मराठे 'देवरा' सिनेमामुळे चर्चेत होती.
श्रुती मराठेला अशी मिळाली साउथ चित्रपटात काम करण्याची संधी-
'दिल के करीब' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रुती मराठेने तिच्या साऊथ इंडस्ट्रीतील डेब्यू फिल्मबद्दल खास आठवणी शेअर केल्या. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, "मी २०१० मध्ये पहिली साउथ फिल्म केली, तमिळ फिल्म केली. तेव्हा अचानक एक दिवस पुण्यातील एका फोटोग्राफरने आली की अशी एक तमिळ सिनेमा आहे तर तू करशील का? कारण त्याचं कास्टिंग चालू आहे. तर तू इंट्रेस्टेड आहे का? असं त्याने मला विचारलं. त्याने तेव्हा मला सगळ्या प्रोसेसबद्दल सांगितलं आणि मग मी होकार दिला."
मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. 'गाढवाचं लग्न', 'क्षणभर विश्रांती', 'नटरंग', 'अजिंठा', 'मितवा', 'पोश्टर गर्ल', 'हिरकणी' अशा सुपरहिट सिनेमांतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी सोनाली दाक्षिणात्य सिनेमातही झळकली. 'मलाइकोट्टई वालीबान' या चित्रपटामध्ये सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर सोनाली कुलकर्णीने काम केलं.
सोनाली कुलकर्णीने 'पिंकमज्जा'ला दिलेला मुलाखती खास किस्सा शेअर केला. "मलाही पहिल्याच चित्रपटासाठी फोन आला त्यानंतर स्क्रिप्ट पाठवण्यात आली. मग मी माझं कॅरेक्टर वैगरे या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि होकार दिला. असा खुलासा तिने मुलाखतीमध्ये केला होता."
४) उपेंद्र लिमये
अलिकडेच अभिनेता उपेंद्र लिमयेचं 'अॅनिमल' या चित्रपटामुळे सर्वत्र कौतुक करण्यात आलं. मराठी, हिंदी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर अलिकडेच तो तेलूगु चित्रपटात काम करताना दिसला. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता व्यंकटेश दग्गुबतीसोबत त्याने स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, उपेंद्र लिमयेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर त्याच्या या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती., "नमस्कार! हा माझा पहिला तेलुगू व्यावसायिक चित्रपट. याचं नाव आहे 'संक्रांतिकी वास्तुनम'. या चित्रपटाचं शूटिंग काल संपलं आणि आज मी या चित्रपटाचं डबिंग सुद्धा संपवलं आहे. हा एक अत्यंत समृद्ध करणारा व्यावसायिक अनुभव मिळाला."
५) श्रेयस तळपदे
श्रेयस तळपदे मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर लवकरच अभिनेता एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव 'अजग्रथा' असं आहे. श्रेयसने या चित्रपटाच्या टीमबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या चाहत्यांना तो दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार असल्याची आनंदवार्ता दिली. हा चित्रपट एक सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर असणार आहे.
लवकरच झळकणार साउथ चित्रपटात
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रेयस तळपदेने त्याच्या आगामी साउथ चित्रपटाबद्दल खुलासा केला. त्यावेळी श्रेयस म्हणाला, "मी सध्या साउथचा चित्रपट करत आहे. कन्नडा प्रोडक्शन अंतर्गत हा चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटात काही तेलगू, कन्नड व काही तमिळ कलाकार आहेत. येत्या पावसाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल."
६) तेजस्विनी पंडित
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.अनेक मालिका, चित्रपटांमध्ये तिने काम केलं. अलिकडेच तेजस्विनी 'अहो विक्रमार्का' या साउथ सिनेमामुळे चर्चेत होती.
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना तेजस्विनी सांगते की, "कोणत्याही नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करताना कलाकारांसाठी त्यातील आव्हानं ही सुखावह असतात. त्यातही आपली मातृभाषा नसलेल्या इतर चित्रपटांमध्ये काम करताना हे आव्हान अधिक कठीण असते."
७) सोनाली कुलकर्णी
आपल्या उत्कृष्ट व खुमासदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं कायमचं घर केलं आहे. मराठीसह हिंदीतही तिनं भरीव काम केलं आहे. दोन्ही इंडस्ट्रीमध्ये कामाचा समतोल राखण्याचा ती प्रयत्न करत असते. दरम्यान, याशिवाय सोनालीने साउथ इंडस्ट्रीतही काम केलं आहे. तिनं साकारलेल्या व्यक्तिरेखेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं.
सोनालीने एका मुलाखतीमध्ये याविषयी म्हणाली," मी फर्स्ट इयरला होते आणि मला गिरीश कर्नाड यांचा 'चेलुवी' नावाचा सिनेमा मिळाला. मात्र, तो सिनेमा अचानक मिळाला नाही. गिरीश कर्नाड यांना चेलुवीच्या भूमिकेसाठी एका अभिनेत्रीचा शोध होता. माझ्याशी गिरीश कर्नाड बोलले याचाच मला आनंद झाला. माझी निवड त्या भूमिकेसाठी होईल असं वाटलंही नव्हतं. पण, माझं सिलेक्शन झालं."