Sushant Shelar Post: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बुधवारी ९ महिन्यांनंतर अंतराळातून पृथ्वीवर सुरक्षितपणे परतल्या आहेत. आठ दिवसांची मोहिम तब्बल ९ महिने लांबल्याने त्यांच्या परतीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून होतं. अखेर त्या परतल्या असून जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सुनीता विल्यम्स सुखरुप परतल्यानंतर भारतीय नागरिक आनंद व्यक्त करीत आहेत. राजकीय क्षेत्रातील दिग्गजांसह अनेक कलाकार मंडळी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अशातच मराठमोळा अभिनेता सुशांत शेलारने (Sushant Shelar) खास पोस्ट लिहिली आहे.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स परतल्यानंतर जगभरातून आनंद व्यक्त केला जात आहे शिवाय त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अशातच मराठी अभिनेता सुशांत शेलारने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलंय, "शौर्याला सलाम! भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अंतराळात ९ महिने राहून विविध संशोधन प्रयोग पूर्ण करून अखेर पृथ्वीवर परतले."
पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "त्यांची शौर्य, धैर्य आणि संयमाची ही ऐतिहासिक कामगिरी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे! अभिनंदन!" अशी सुंदर पोस्ट सुशांत शेलारने शेअर केली आहे.
दरम्यान, सुशांत शेलारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने 'दुनियादारी', 'क्लासमेट', 'मॅटर' आणि 'धर्मवीर' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सुशांत शेलार अभिनय आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात सक्रिय आहे.