'का रे दुरावा' या मालिकेतून अभिनेता सुयश टिळक घराघरात पोहोचला. उत्तम अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. सुयशने मालिकांबरोबरच सिनेमातही काम केलं आहे. विविधांगी भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. सुयश सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा समाजातील विविध गोष्टींवर तो व्यक्त होताना दिसतो. आतादेखील सुयशने त्याच्या व्हिडिओतून एका महत्त्वाच्या गोष्टीकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
सुयशने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने एक प्रसंग सांगितला आहे. सध्या लहान मुलं बघत असलेल्या कार्टुनबाबत आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या भाषेवर आक्षेप घेत त्याने महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.
व्हिडिओत काय म्हणाला सुयश टिळक?
मी आता एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तिथे माझ्या शेजारच्या टेबलवर एक फॅमिली बसली होती. त्यांची ३-४ वर्षांची एक मुलगी होती. ती मुलगी खूप धिंगाणा घालत होती आणि आकांडतांडव करत होती. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला मोबाईलवर मोठ्या आवाजात एक कार्टुन लावून दिलं.
एरव्ही या गोष्टीकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष केलं असतं. कारण, ती त्यांची पर्सनल स्पेस आहे.पण, त्या मोठ्या आवाजात लावलेल्या कार्टुनचे काही डायलॉग माझ्या कानावर पडले. मला राहवलं नाही, म्हणून हा व्हिडिओ मी करत आहे.
त्या कार्टुनमध्ये दोन मुलं आणि एक लहान मुलगी असते. त्यातला एक मुलगा त्या मुलीला म्हणतो की तुम कितनी क्युट हो...क्या मै तुम्हे प्यार से बेबी पुकार सकता हूं?
त्यावर त्याचा मित्रा त्याला मागून मारतो आणि म्हणतो, "अबे ऐ अकल के दुश्मन ये क्या कर रहा है? तू उसे प्रपोज करने आया था ना, धीरे क्यूं बोल रहा है?"
पुढे त्या मुलीला म्हणतो, "मै तो मजाक कर रहा था...क्या मै तुम्हे प्यार से डिअर डार्लिंग बुला सकता हूँ?"
त्यावर ती मुलगी हसते आणि म्हणते, "तुम कितने क्यूट हो".
त्यानंतर तो मित्र म्हणतो- "अरे वाह भाई, तेरी तो निकल पडी"
हे अशा आशयाचं कार्टुन कोण बनवतंय? आणि मुळात पालक आपल्या मुलांना हे असे कार्टुन का दाखवत्यात? हे माझ्या समजण्यापलिकडे आहे.
सुयशचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. दरम्यान, अलिकडेच सुयश अबोली मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला. त्याने 'बापमाणूस', 'पुढचं पाऊल', 'दुर्वा', 'जाऊ नको दूर बाबा', 'सख्या रे' या मालिकांमध्ये काम केलं आहे.