‘सैराट’ (Sairat) सिनेमा आठवला की, पाठोपाठ आठवतात ते आर्ची-परश्या, लंगड्या, सल्या. सिनेमातील ही पात्र आणि ही पात्र साकारणारे कलाकार तुफान लोकप्रिय ठरले. या ना त्या कारणानं सर्वांचीच चर्चा होत असते. तूर्तास चर्चा आहे ती ‘लगंड्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गळगुंडे (Tanaji Galgunde) याची. होय, तानाजी सध्या वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. ‘सैराट’नंतर आयुष्य कसं बदललं, ते त्याने सांगितलं आहे.‘सैराट’नंतर नागराज मंजुळेंच्या ‘घर बंदुक बिरयानी’ या सिनेमातही तानाजी झळकला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमात तानाजीने छोटी पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याच चित्रपटाच्या एका प्रमोशनल व्हिडीओमध्ये तानाजीने ‘सैराट’ आधीचा तो आणि ‘सैराट’ नंतरचा तो याबद्दल बोलतोय.
तो म्हणाला...‘सैराट’नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. सिनेमाच्या आधी मी शेती करत होतो आणि शेती करत करत कॉलेज करायचो. पण एक मर्यादा होती. शेती करत असतो तर त्याच गोष्टीत राहिलो असतो मी. कुठं बांधावरची भांडणं म्हणा किंवा तसंच काही. माझी काही त्यापलीकडे प्रगती झाली नसती. सिनेमात आल्यानंतर माझा आवाका वाढला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला खूप चांगली माणसं मिळाली. चांगले लेखक कळाले. चार पुस्तकं वाचली. हळूहळू माझा गोष्टीकडं बघण्याचा माझा दृष्टीकोन बदललाय. आयुष्यातल्या खूप अशा गोष्टी बदलल्यात...
पायाची गोष्ट माझी... मला वाटत नाही की, मी माझे पाय कधी सरळ करून घेऊ शकलो असतो. नाही म्हटलं तरी आता मी आठ-दहा लाख मी पायावर खर्च केलेत. हे श्रेय सैराटचंच आहे. सैराटमुळे, आटपाटमुळे, अण्णांमुळे केवळ मी ॲक्टर झालो, लोकप्रिय झालो असं नाही तर माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या. आर्थिक दृष्ट्या मी सक्षम झालोय. आयुष्य सुखकर झालं. आता पुढे काय होतं, ते बघूच... पुढचा प्रवास काय असेल मला माहित नाही.. आता कदाचित शेतीही करेल. पण भारी शेती करेल. सैराटमुळे माझं आयुष्य सेट झालं...,असं तानाजी म्हणाला.