संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित Animal सिनेमात मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेनेही लक्ष वेधून घेतलंय. त्याच्या एन्ट्रीला अक्षरश: थिएटरमध्ये शिट्टया वाजत आहेत. त्याने साकारलेली फ्रेडी भूमिका लोकांना प्रचंड आवडली आहे. 'डॉल्बीवाल्या बोलव माझ्या डीजे ला' या गाण्याचा वापर, उपेंद्रचे मराठी डायलॉग्स आणि दादागिरी सगळंच अगदी जमून आलंय. हिंदीत गाजत असलेला हा Animal सारखा सिनेमा मराठीतही होऊ शकतो का यावर उपेंद्र लिमयेने स्पष्टच उत्तर दिलं आहे.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत उपेंद्र लिमये म्हणाला, "कंटेंट ओरिएंटेड फिल्म्स आपल्याकडे चांगल्या बनतातच. त्यात काहीच दुमत नाही. प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक मराठी माणसाला हिंदी येतंच. त्यामुळे ते सगळं तिकडे बघायला मिळतं. बरं, साऊथचे स्थानिक सिनेमे चालतात कारणत्यांची मातृभाषा तमिळ, तेलुगू आहे पण त्यांची दुसरी भाषा इंग्रजी आहे. त्यांना हिंदी फारसं येतंच नाही. तसंच त्यांच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आणि सिनेमा आहे. म्हणजे एखादा जर १०० रुपये दिवसाला कमावतो तर तो त्यातलेही पैसे थिएटरमध्ये देऊन सिनेमा बघेल इतके ते सिनेप्रेमी असतात. तसं आपल्याकडे नाहीए."
तो पुढे म्हणाला,"आघाडीचे टेक्निशियन्स, डीओपी, दिग्दर्शक, लेखक आपल्याकडेही आहेत. हिंदी लोकांना आपला आदर आहेच. महेश लिमये, सुधीर पळसाने, लक्ष्मण उतेकर, अविनाश अरुण खूप मोठी मोठी नावं आहेत. पण आपल्याकडे रिजनलचं गणितच वेगळं आहे. जर तुम्ही एक पॅकेज बनवून उत्तम कंटेंट प्रेक्षकांसमोर आणला तर नक्कीच प्रतिसाद मिळेल. आपल्याकडेही ते सगळं होईल पण तेवढा बिझनेस जनरेट झाला पाहिजे. बिझनेस आला तर त्या प्रोफेशनलिझमचं महत्व आणखी वाढेल. मी आपल्या मराठी इंडस्ट्रीविषयी अजिबातच निराशावादी नाही. खूप अभिमान आहे मला आपल्या मराठी इंडस्ट्रीचा."
उपेंद्र लिमये अतिशय प्रतिभावान अभिनेता आहे. त्याला 'जोगवा' या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. उपेंद्रने मराठीसोबतच हिंदी आणि साऊथ सिनेमातही भूमिका साकारल्या आहेत. त्याची स्टाईल, भाषा, आवाज सगळंच प्रेक्षकांना भिडतं. Animal मध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर सारख्या स्टार कलाकारांमध्येही त्याचा वेगळेपमा उठून दिसतो.