मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलची भुरळ सेलिब्रिटींनाही पडते. कधी सिनेमाचं प्रमोशन म्हणून कधी ट्राफिकचा वेळ वाचवायचा म्हणून तर कधी सहजच सेलिब्रिटी लोकलने प्रवास करताना दिसतात. आताही एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी लोकलची वाट धरली. लोकलने प्रवास करतानाचे फोटो शेअर करत या मराठी अभिनेत्याने पोस्टही लिहिली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून विकास पाटील आहे.
विकासने बोरीवली ते चर्नी रोड असा मुंबई लोकलने प्रवास केला. याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. यामध्ये विकासने डेनिमचं जॅकेट, डोक्यावर कॅप आणि डोळ्यावर गॉगल घातल्याचं पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत विकास म्हणतो, "नाटकाच्या निमित्तानं खूप साऱ्या गोष्टी नव्यानं ट्राय करता आल्या ज्या कधी काळी करत होतो किंवा पहिल्यांदाच करायला मिळाल्या. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे मुंबई लोकलने प्रवास... मुंबईत सुरुवातीला आलो तेव्हा लोकल हीच lifeline होती, मग कालांतराने bike आली मग कार आणि लोकलशी नातं तुटत गेलं... पण 'ऑल दी बेस्ट'च्या निमित्ताने पुन्हा एकदा ह्या lifeline चं महत्व कळलं. कारण, मुंबईत कुठेही वेळेत पोचायचं असेल आणि खास करून प्रयोगासाठी तर लोकलला पर्याय नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. असाच हा एक प्रवास बोरिवली ते चर्नी रोड...गिरगाव साहित्य संघातला प्रयोग..."
सध्या विकास 'ऑल द बेस्ट' या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. त्याने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. 'लेक माझी लाडकी', 'वर्तुळ', 'जय जय स्वामी समर्थ', 'बायको अशी हवी' अशा मालिकांमध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला.