Join us

अभिनेता विराजस कुलकर्णीला पुण्यात दिसलं होतं ‘भूत’; विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 2:36 PM

Virajas Kulkarni sharing his experience about a ghost : भूत आहेत की नाहीत, या वादात आम्ही पडणार नाही. पण हो, विराजसनं सांगितलेला बोबडी वळवणारा अनुभव मात्र तुमच्याशी शेअर करणार आहोत.

भूताच्या गोष्टी तुमच्यापैकी सर्वांनीच कधी ना कधी ऐकल्या असतील. कितीही भीती वाटली तरी हॉरर चित्रपट, पुस्तकं वाचायला अनेकांना आवडतात. भूत आहेत की नाहीत, या वादात आम्ही पडणार नाही. पण हो, एका अभिनेत्यानं सांगितलेला बोबडी वळवणारा अनुभव मात्र यानिमित्तानं तुमच्याशी शेअर करणार आहोत. होय, मराठीतला लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) याने त्याच्यासोबत घडलेला एक भयावह किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.  विराजसने एक व्हिडीओ शेअर केला आहे.   

व्हिडीओ विराजस म्हणतो, ‘ एकदा खूप रात्री प्रॅक्टिस संपल्यावर माझा मित्र मिहिर मला टू व्हिलरनी माझ्या घरी सोडत होता आणि पूल चढत असताना मला असा क्षणभरासाठी भास झाला की, एक पांढरी टोपी, पांढरा सदरा घातलेला माणूस सायकल ओढत एकदम आमच्या मधे आला. तो भास झाला आणि मी एकदम मिहिरला गचकन धरलं. त्यानी सुद्धा एकदम जोरात ब्रेक दाबला आणि आम्ही थांबलो. तो भास होता. मला क्षणार्धात कळलं की तो भास होता. त्यामुळे मी मिहिरला सॉरी म्हणणार, एवढ्यात तोच मला सॉरी म्हणला. सॉरी, विराजस मला असा एकदम भास झाला की,कुणीतरी पांढरी टोपी, सदरा घातलेली व्यक्ती सायकल घेऊन मध्ये आला, असं तो मला म्हणाला. त्याचं ते वाक्य ऐकल्यावर माझी तंतरली. त्याला म्हणालो, लगेच घरी चल, इथे कुठेच थांबायला नको. हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही. नक्की काय झालं होतं माहित नाही...’

विराजसचा हा व्हिडीओ  सध्या चांगलाच व्हायरल होतोय. अर्थात विराजसने व्हिडीओत सांगितलेला अनुभव नक्की खरा आहे की प्रमोशनचा भाग आहे, हे मात्र कळायला मार्ग नाही. कारण   कारण ही पोस्ट शेअर करतेवेळी त्याने त्याच्या ANATHEMA या नाटकाचा उल्लेख केला आहे. शिवाय या पोस्टच्या शेवटी नाटकाचं एक पोस्टरही दिसत आहे.  

टॅग्स :विराजस कुलकर्णीमृणाल कुलकर्णी