मुंबई – आधुनिक युगात जगाला सोशल मीडियाने जवळ आणलं असलं तरी याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्याबद्दल वाईट आणि बदनामीकारक मजकूर पसरतो, सेलेब्रिटी, राजकीय नेत्यांना अनेकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. काहीवेळा अश्लिल शब्दामध्ये फोटो आणि व्हिडीओवर कमेंट केल्या जातात. अशाच एका प्रकारातून संतापलेल्या मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेने ट्रोलर्सला चांगलाच सज्जड दम दिला आहे.
खुलता कळी खुलेना फेम अभिनेत्री अभिज्ञा भावेने फेसबुकवर पोस्ट टाकून म्हटलं आहे की, आता बस्स झालं, अलीकडेच सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणात होत असल्याने सायबर गुन्ह्यात वाढले आहेत. मलादेखील विविध कारणांवरुन सोशल मीडियातून त्रास दिला जात आहे. परंतु यापुढे जर कोणी खोटी, अपमानास्पद, अश्लिल आणि बेजबाबदार कमेंट केली तर मी कायदेशीर तक्रार करेन. यात माझ्या स्पॅम मेसेजचाही समावेश असेल. आम्ही सेलेब्रिटी आहोत म्हणून वाट्टेल ते आमच्याबद्दल बोलले जाते हे माझ्या निर्दशनास आले आहे. कोणतीही वस्तूस्थिती माहिती नसताना आमचं वागणं, बोलणं, विचार करणं याबाबत त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जगायचं आणि जर हे केले नाही तर तुम्ही बेजबाबदार आहात, मराठी कलाकार आहात म्हणून काहीपण करायचं. कलाकार असल्याचा माज वैगेरे असं बोललं जातं.
सेलेब्रिटी होण्यापूर्वी मी एक सामान्य माणूस आहे, जी १० वर्षापूर्वी होती आणि आयुष्यभर सामान्य राहील, मी माझ्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक निर्णयाबद्दल कोणालाही भाष्य करण्याचा किंवा न्याय करण्याचा अधिकार कोणालाही देत नाही आणि मलाही (जे कलाकारांचे चाहते आहेत) कोणताही अधिकार नाही की मी दुसऱ्याच्या आयुष्यातील निर्णयावर बोलेन जरी ते माझ्यादृष्टीने अयोग्य आहे असं अभिज्ञाने सांगितले.
त्याचसोबत मी माझ्या सोशल मीडियात जे काही पोस्ट करते, मी जे कपडे घालते, कोणतंही प्रमोशन करते, फोटो, मेसेज हे पूर्णपणे माझ्या अधिकाराखाली आहे आणि माझे स्वतःचे वैयक्तिक मत आहे, ही मते नेहमी आपल्या विचारांशी जुळतील असं नाही. मी कोणत्या धर्माचे अनुसरण करते, कोणती भाषा बोलते किंवा कोणत्या देशात राहते हे नेहमीच जोडले जाऊ नये. हे माझं पेज आहे. माझे विचार आहेत आणि माझ्याशिवाय यावर कोणाचाही हक्क नाही असं अभिज्ञाने ट्रोलर्सला बजावलं आहे.
दरम्यान, हे मी जे बोलतेय ते माझ्या सर्व मित्रांच्यावतीनेही बोलतेय. त्यामुळे अशा कमेंट्स माझ्या फेसबुक पेजवर, युट्यूब, ट्विटर आणि कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही याची तक्रार नोंदवली जाईल. त्यामुळे जे वाईट कमेंट करत नाहीत त्यांना विनंती आणि जे करतात त्यांना यापुढे कुठल्याही चुकीला माफी नाही अशा शब्दात अभिज्ञा भावेने ट्रोलर्सला सज्जड दम दिला आहे.