Join us

फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 3:23 PM

अक्षया गोव्याहून मुंबईला विमानाने परतली. पण, यादरम्यान तिला प्रवासाचा वाईट अनुभव आला. याबाबत तिने पोस्ट शेअर करत नामांकित विमान कंपनीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून अभिनेत्री अक्षया नाईक घराघरात पोहोचली. अक्षयाने मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. पण, सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. नुकतंच अक्षया गोव्याहून मुंबईला विमानाने परतली. पण, यादरम्यान तिला प्रवासाचा वाईट अनुभव आला. याबाबत तिने पोस्ट शेअर करत नामांकित विमान कंपनीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या संबंधित काही पोस्ट शेअर केल्या आहेत. "मोपा एअरपोर्टवरुन आमची फ्लाइट संध्याकाळी ५.२५ मिनिटांनी सुटणार होती. हवामानामुळे उशीर झाला हे समजू शकतो. पण, दुसरी विमाने उड्डाण घेत असताना आम्ही मात्र अजूनही उभेच आहोत. आम्हाला योग्य ती मदतही मिळाली नाही. यावर कारवाई झाली पाहिजे. ५ तासांहून अधिक वेळ झाला आहे. तरीही आम्ही इथेच आहोत," असं अक्षयाने पहिल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पुढच्या पोस्टमध्ये ती म्हणते, "दुपारी ३ वाजल्यापासून लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती एअरपोर्टवर बसून आहेत. आणि त्यांनी मदतीची कोणतीच तयारी दाखवलेली नाही. रात्रीचं जेवणंही कुणीतरी सांगितल्यानंतर देण्यात आलं. ते आमच्याशी खोटं बोलत आहेत. एअर इंडिया कंपनीचे कर्मचारी नीट बोलतंही नाहीत. त्यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरं नाहीत". 

तब्बल ८ तासांनी विमान उडाल्याचं अक्षयाने दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. "जवळपास ८ तास होत आले आहेत...ऑपरेशनल क्रू नव्हता म्हणून मुंबईहून विमानाला उड्डाण घेण्यास उशीर झाला. बरं तिकिटाचे पैसे परत करण्याबाबतही कोणी काही बोलत नाहीये", असं तिने म्हटलं आहे. तब्बल ९ तासांनंतर रात्री ३ वाजता अक्षयाने मुंबई गाठल्याचं दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. अक्षयाने या स्टोरीमध्ये एअर इंडिया या कंपनीला टॅग करत संताप व्यक्त केला आहे. 

टॅग्स :अक्षया नाईकटिव्ही कलाकार