Join us

"मासिक पाळीबद्दल वडिलांना आधी सांगितलं", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य, म्हणाली, "त्यांनी मला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 11:31 AM

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, "मासिक पाळीबद्दल वडिलांना सांगितलं तेव्हा..."

अतिशा नाईक या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी ‘गुड बाय’ नाटकातून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं होतं. अभिनयाच्या जोरावर त्यांनी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. उत्तम अभिनयाबरोबरच अतिशा नाईक त्यांच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखल्या जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अभिनयातील करिअर, वैयक्तिक आयुष्य आणि अनेक घटनांबद्दल भाष्य केलं.

'इट्स मज्जा' या युट्यूब चॅनेलला अतिशा नाईक यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांबद्दलही भाष्य केलं. या मुलाखतीत त्यांनी वडिलांच्या निधनाचा प्रसंग आणि त्यानंतर बदललेलं आयुष्य याबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, “अपघातात माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. मी त्यांच्यावर खूप अवलंबून होते. मला कोणत्याच गोष्टीची किंमत माहीत नव्हती. वडील गेल्यानंतर एका क्षणात मला माणसांची किंमत कळली. कालपर्यंत आपला आधार असणारा माणूस आज आपल्यात नाही. तो अनुभव मला आयुष्यभरासाठी पुरला. माझ्याबाबत मत न बनवणारी ती एकमेव व्यक्ती होती. अशा माणसाचा आधार गेल्यानंतर आयुष्यात अवलंबून राहून जमणार नाही, हे मला समजलं. त्यानंतर अनुभवातून मी खूप काही शिकले. माझे वडील जाणं हे माझ्यासाठी आजही खूप मोठं नुकसान आहे. पण, त्यांच्या जाण्याने मला आयुष्याकडे बघण्याची ताकद मिळाली. त्यामुळे मी आता आयुष्यात कोणत्याही गोष्टीला सामोरी जाऊ शकते.

“आपण वोट करणारे मूर्ख”, ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य, म्हणाली, “सध्याच्या राजकारणात फक्त...”

वडिलांबरोबरच्या नात्याबद्दल बोलताना अतिशा यांनी एक प्रसंगही शेअर केला. “मला मासिक पाळी आल्यानंतर मी सगळ्यात आधी माझ्या वडिलांना सांगितलं होतं. मी घाबरले होते. काय झालंय हे मला कळत नव्हतं. काय करायचं हे कळत नव्हतं. त्याला मासिक पाळी म्हणतात हेच मला माहीत नव्हतं. कारण, आपल्याकडे त्यादृष्टीने शिक्षण दिलं जात नाही. आता शिक्षणपद्धती बदलली आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल आता शिक्षण दिलं जातं. पण, मला ते मिळालं नव्हतं. त्यामुळे हे काय झालंय, तेच मला कळत नव्हतं. वडिलांबरोबर चांगलं बाँडिंग असल्याने मी त्यांनाच ही गोष्ट सर्वात आधी सांगितली होती. त्यानंतर त्यांनी मला मी तुला याबद्दल जास्त काही सांगू शकणार नाही. आई तुला सांगेल, असं सांगितलं होतं. पण, काहीतरी बडबड करू नकोस, असं ते काहीच बोलले नाहीत. मला मासिक पाळीबद्दल वडिलांना सांगण्यात काहीच वाटलं नाही. मला वाटतं, हा विश्वास प्रत्येक नात्यात असायला हवा,” असं त्या म्हणाल्या.

अतिशा नाईक यांनी अनेक मराठी मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘घाडगे आणि सून’, ‘सुंदरी’ अशा अनेक मालिकांत त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे. ‘वेक अप सिद’ या चित्रपटात त्यांनी रणबीर कपूरसह स्क्रीन शेअर केली आहे.  

टॅग्स :अतिशा नाईकमराठी अभिनेतामराठी चित्रपटटिव्ही कलाकार