झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ( Tujhyat Jeev Rangala) या मालिकेत नंदिनी वहिनी साहेबांची भूमिका साकारून तुफान लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर ( Dhanashri Kadgaonkar) . या मालिकेतील वहिनी साहेबांचा गावरान ठसका म्हणजे लाजवाब. त्यामुळेच मालिका संपूर्ण बरेच दिवस झाले असले तरी वहिनी साहेबांना लोक विसरू शकलेले नाही. प्रेग्नंसीमुळे धनश्रीने अर्ध्यावर ही मालिका सोडली होती. पण आता आई झाल्यावर, धनश्री पुन्हा टीव्हीवर परतली आहे. ‘तू चाल पुढं’ या मालिकेत ती शिल्पीची भूमिका साकारताना दिसतेय. पण खरी बातमी पुढे आहे.होय, आजपासून झी मराठीवर ‘दार उघड बये’ ही मालिका सुरू होतेय. या मालिकेच्या निमित्ताने धनश्रीने तिच्या आयुष्यातील ‘दार उघड मोमेंट’ शेअर केली आहे.
ती म्हणते, 12 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा सुपरस्टार शो सुरू झाला होता. जो शो एक अँक्टिंग हंट शो होता. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेत मुलं मुली आली होती. त्यातून माझं सिलेक्शन झालं. मी टॉप 5 मध्ये आले. ती स्पर्धा झाल्यानंतर मला स्वत:हून अनेक कामांच्या ऑफर्स येऊ लागल्या. मी कामं करत गेले. तेव्हा मला जाणवलं की हे क्षेत्र आपल्याला आवडतंय. या क्षेत्रातच आपल्याला काही तरी करायचं आहे. हा क्षण माझ्या आयुष्यातील दार उघड प्रसंग होता.’
धनश्रीनं 2012मध्ये महाराष्ट्राच्या सुपरस्टार कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यानंतर 2013मध्ये ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकेतून तिला मोठा ब्रेक मिळाला. या मालिकेत ती नायिकेच्या भूमिकेत होती. त्यानंतर तिनं ‘चिठ्ठी’ या सिनेमात काम केलं. 2016मध्ये धनश्रीला ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका मिळाली. या मालिकेनं तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारण्याआधी धनश्रीनं गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेत काम केलं होतं.