मराठी मनोरंजनसृष्टीत मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) आणि गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) या बहिणींची जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे. त्यांची भांडणं, मजामस्ती बघायला सगळ्यांनाच मजा येते. नुकतंच गौतमी देशपांडेचं स्वानंद तेंडुलकरसोबत लग्न झालं. त्यांच्या लग्नात swaG आणि Lafdi हे हॅशटॅग फारच व्हायरल झाले. पण या लफडी हॅशटॅगचा नेमका काय अर्थ आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. यावर मृण्मयीने उत्तर दिलं आहे.
मृण्मयी देशपांडेने लहान बहीण गौतमीच्या लग्नात प्रचंड धमाल केलेली आहे. तिने थोड्यावेळापूर्वीच सोशल मीडियावर हळदीच्या दिवशीचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. गौतमीच्या लग्नात मृण्मयीने मागे काय काय मजामस्ती केली याचा एक बीटीएस व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर एकाने विचारले,'#Lafdi चा नेमका अर्थ काय आहे?' यावर मृण्मयी स्वानंदला टॅग करत म्हणाली,'यालाच विचारा. मलाही नाही माहित पण तो सारखा बोलत असतो की लफडी नकोय लफडी नकोत.'
गौतमी आणि स्वानंद २५ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. सध्या ते कोकणातील देवबाग येथे क्वॉलिटी टाईम व्यतीत करत आहेत. त्यांच्या लग्नातील सर्व फंक्शन्सचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वानंद तेंडुलकर मराठीतील पहिलं डिजीटल चॅनल 'भाडिपा'चा बिझनेस हेड आहे. स्वानंद आणि गौतमीचं नक्की कसं जुळलं याची चाहत्यांना उत्सुकता आहे. या जोडीवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.