Join us

'कशा प्रकारचा अभिनेता आहे हा?'; नाना पाटेकरांचं सेटवरील वागणं पाहून थबकली गिरीजा ओक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 8:40 AM

Girija oak: अलिकडेच रिलीज झालेल्या वॅक्सिन वॉर या सिनेमा गिरीजा आणि नाना पाटेकर यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक (girija oak) सध्या तिच्या वॅक्सिन वॉर या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवल्यानंतर गिरीजाने तिचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा 'जवान' हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर आता तिचा 'वॅक्सिन वॉर' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात तिने अभिनेता नाना पाटेकर (nana patekar) यांच्या सोबत स्क्रीन शेअर केली आहे. अलिकडेच गिरीजाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने नाना पाटेकरांसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

"आपण सगळेच जण इतरांविषयी डोक्यात एक इमेज ठेऊन असतो. काही लोकांविषयी आपला एक विशिष्ट दृष्टीकोन असतो आणि त्याच दृष्टीकोनातून आपण समोरच्याकडे पाहतो. मला नानांसोबत काम करताना खूप छान वाटलं. त्यांचा स्वभाव मस्त आहे. नाना सगळ्यांसोबत बसून जेवायचे, गप्पा मारायचे. विशेष म्हणजे जेव्हा दिग्दर्शक अॅक्शन म्हणायचे त्यावेळी ते एकदम बदलून जायचे. म्हणजे आमच्यासोबत असलेले नाना आणि कॅमेरासमोर असलेले नाना यांच्यात खूप फरक आहे", असं गिरीजा म्हणाली.

पुढे ती म्हणते,  "त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतरे बदलायचे की मी त्यांच्याकडे पाहात बसायचे. कशा प्रकारचा अभिनेता आहे हा? काय करतायेत काय हे आणि, कसं जमवतात हे सगळं?  ते सेटवर पूर्ण तयारीनिशी येतात. त्यांनी अख्खी स्क्रिप्ट आधीच लिहून काढलेली असते. ते तसे संवाद लक्षात ठेवतात. म्हणजे स्क्रिप्टच्या मागे जे रिकामं पान असतं त्यावर त्यांनी त्यांचे संवाद लिहून ठेवलेले असतात. समोरच्याच्या वाक्याची शेवटची ओळ आणि त्यांचे संवाद. त्यांच्यासोबत काम करणंही तितकंच छान होतं."

दरम्यान, 'द काश्मीर फाइल्स' सुपरहिट ठरल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांचा 'द व्हॅक्सीन वॉर' हा सिनेमा २८ सप्टेंबरला रिलीज झाला. करोना काळात भारताच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या कोव्हिड प्रतिबंधक लस संशोधनाचा प्रवास या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे. या सिनेमात नाना पाटेकर, अनुपम खरे, पल्लवी जोशी, गिरीजा ओक हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. 

टॅग्स :गिरिजा ओकनाना पाटेकरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा