राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरुद्ध वादग्रस्त शब्दांतील कविता शेअर करणं अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) चांगलंच महागात पडलं आहे. मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. इतकंच नाही तर नवी मुंबईतील कळंबोली येथून ठाणे क्राइम ब्रँचने तिला ताब्यातही घेतलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच गाजत असताना मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी तिखट शब्दांत केतकीवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
किशोरी पेडणेकर यांनी एक पत्रकार परिषद घेत केतकीवर प्रतिक्रिया दिली आहे. "मला त्या मुलीबद्दल काही बोलायचं नाही. ती मनोरुग्ण आहे. सध्या ती त्याचे धडे घेत आहे. तिला मधूनच झटका येतो. त्याच झटक्यामध्ये काहीतरी झालं असेल ज्यामुळे तिने अशी प्रतिक्रिया दिली असावी. आणि, त्यामुळेच आता तिच्यावर टीका होत आहे," असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
काय आहे केतकीची पोस्ट?
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या केतकीने तिच्या फेसबुक पेजवर एक कविता पोस्ट केली. या पोस्टमध्ये तिने शरद पवार यांच्यावर वादग्रस्त शब्दांत टीका केली आहे. "ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक..", असे शब्द वापरुन तिने ही टीका केली आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपा, मनसे अशा अनेक राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. इतकंच नाही तर केतकीवर शाई फेकही करण्यात आली आहे.
दरम्यान, केतकीने यापूर्वीही अशा प्रकारच्या काही वादग्रस्त पोस्ट करुन अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केतकीला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.