'झिम्मा', 'सनी', 'चोरीचा मामला', 'संशय कल्लोळ', 'आनंदी गोपाळ' अशा मराठी चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारून अभिनेत्री क्षिती जोग घराघरात पोहोचली. मराठीबरोबरच क्षितीने हिंदी कलाविश्वातही नाव कमावलं. 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'मान रहे तेरा पिता', 'बनो मे तेरी दुल्हन' या हिंदी मालिकांमधून क्षितीने अभिनयाचा ठसा उमटवला. करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातही क्षिती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. अभिनयातून मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत जम बसवलेल्या क्षितीचा आज वाढदिवस आहे.
क्षितीच्या वाढदिवसानिमित्त 'लोकमत फिल्मी'ने तिच्याशी खास गप्पा मारल्या. यावेळी क्षितीने वाढदिवसाची करण जोहरची एक खास आठवण सांगत किस्सा शेअर केला. १ जानेवारीला वाढदिवसा असल्याने कोणाच्याही तो लक्षात राहत नाही. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाढदिवस येत असल्याने अनेकांच्या तो लक्षात राहत नाही. त्यामुळे करण जोहर सरांच्याही तो लक्षात नव्हता, असं क्षितीने सांगितलं. ती म्हणाली, "गेल्या वर्षी मला वाढदिवसाच्या दिवशी त्यांचा मेसेज आला नव्हता. तीन दिवसांनी त्यांचा मेसेज आला."
"तुझा बर्थ मी मिस केला. मला माफ कर. हॅपी बर्थडे, असं ते म्हणाले. पण, मला याची सवय आहे. कारण, थर्टी फस्टची रात्र लोक जागवतात. मग, १ जानेवारीचा दिवस त्या जागराणात जातो. त्यामुळे मला हमखास बर्थडेनंतर विश येतात. माझे अनेक मित्रमैत्रिणीही मला ३-४ तारखेला विश करतात. गेल्या वर्षी करण जोहर सरांचा असा मेसेज आला होता. त्यामुळे यावर्षीही उशीराच मेसेज येईल, असं वाटतंय," असंही पुढे क्षितीने सांगितलं.
दरम्यान, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २'मध्ये क्षिती झळकली होती. २०२१मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' सिनेमाचा हा सीक्वल होता. या सिनेमाचं दिग्दर्शन हेमंत ढोमेने केलं होतं. सहा आठवड्यानंतरही हा सिनेमा चित्रपटगृहांत धुमाकूळ घालत असून बॉलिवूड चित्रपटांना तगडी टक्कर देत आहे.