'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) उत्तम कलाकार तर आहेच पण ती फार छान गाते हेही अनेकदा माहित असेल. मधुराणीचे गाणी गातानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच तिचा आवाजही गोड असल्याच्या प्रतिक्रिया चाहते देत असतात. मात्र नुकतंच एका कार्यक्रमात मधुराणीला अजय अतुलचं लोकप्रिय 'देवाक काळजी रे' हे गाणंच माहित नसल्याचं समोर आलं. यामुळे आता मधुराणी चांगलीच ट्रोल होत आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवर 'होऊ दे धिंगाणा' हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा सुरु झाला आहे. आपला सिद्धू म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. त्याच्यामुळे कार्यक्रमात धमाल येते. तसंच वाहिनीवरील दोन मालिकेतील कलाकार एकमेकांविरुद्ध कार्यक्रमात स्पर्धा करतात. यामध्ये 'साडे माडे शिंतोडे' हा एक सेगमेंट असतो. लोकप्रिय मराठी गाण्यांच्या ओळी टेलिप्रॉम्पटरवर दिलेली असतात आणि दोन्ही टीममधील एका स्पर्धकाला येऊन गाणं म्हणायचं असतं. गंमत म्हणजे या गाण्याच्या ओळींमधील काही शब्द गाळलेली असतात. दरम्यान मधुराणीला 'रेडू' सिनेमातील अजय अतुलचं लोकप्रिय 'देवाक काळजी रे' हे गाणं येतं. मात्र हे कोणतं गाणं आहे याचा मधुराणीला गंधही नसल्याचं दिसून आलं. तिला एकही ओळ म्हणता आली नसल्याने नेटकरी तिच्यावर नाराज झाले. सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी मधुराणीला ट्रोल केलं आहे.'काय तुम्ही सिंगर आहात.. हे गाणं माहित नाही.. काय उपयोग', 'एवढं गाणं येत नाही हे गाणं तर खूप हिट झाल आणि काय तुम्हाला गाणं येत नाही' अशा कमेंट्स युझर्सने केल्या आहेत.