अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) या दिग्गज अभिनेत्री. राजा शिवछत्रपती किंवा फर्जंद मधील आई जिजाऊ असोत, लढवय्यी अवंतिका असो वा मुलांना मदत करणारी सोनपरी. विविध शेड्स असणाऱ्या भूमिका मृणाल यांनी अगदी लीलया साकारल्या. याच मृणाल कुलकर्णींनी लोकमत फिल्मीच्या My 1st With Mrinal Kulkarni या सेगमेंटमध्ये धम्माल प्रश्नांची धम्माल उत्तरं दिलीत. पहिली फ्लाईट, पहिला फसलेला पदार्थ, पहिला सेलिब्रिटी क्रश असे अनेक प्रश्न मृणाल यांना विचारण्यात आले. अशी पहिली डिश जी अजिबात आवडली नाही, असा एक प्रश्नही त्यांना केला गेला. यावर त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. होय, चीनला फिरायला गेल्यावर त्यांनी चक्क तळलेले किडे खाल्लेले.
हा अनुभव शेअर करताना त्या म्हणाल्या, “काही वर्षांपूर्वी मी, विराजस आणि विराजसचे बाबा असे आम्ही चीनला फिरायला गेलो होतो. तिथे खूप इंटरेस्टिंग पदार्थांची नावं दिसत होती, पण ते नक्की काय असेल याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. तेव्हा आम्हाला काही तळलेले किडे मिळाले. त्याची चव फार छान होती पण त्याचं जे वर्णन होतं ते ऐकल्यावर काही खाण्याची शक्यता नव्हती.”
असा पहिला लूक कुठला होता ज्याने फजिती केली होती? असं त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, “मी आयुष्यात पहिली भूमिका जी केली ती ‘स्वामी’ कादंबरीवर आधारित मालिकेत रमाबाई पेशवेंची केली. त्या भूमिकेसाठी मला नऊवारी साडी नेसायची होती. बाबासाहेब पुरंदरे यांनी मला त्या काळामध्ये खरी पैठणी दिली होती. वयाच्या १५-१६व्या वर्षी एवढी मोठी खरी नऊवारी पैठणी नेसून माझं मला उभंही राहवत नव्हतं, मला ते नीट सांभाळता येत नव्हतं, पेलवतही नव्हतं. त्यातून दिवसभर ती नऊवारी पैठणी नेसून वावरणं हा माझ्यासाठी एक कठीण टास्क होता.”
मृणाल कुलकर्णी यांच्या खाजगी आयुष्याबाबत सांगायचं तर 1990 साली मृणाल यांनी रूचिर कुलकर्णी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. अगदी वयाच्या 19 व्या वर्षी मृणाल लग्नबेडीत अडकल्या. मृणाल व रूचिर यांच्या लग्नाला तीन दशकांचा काळ लोटला आहे. मृणाल आणि रुचिर एकमेकांना तसे लहानपणापासून ओळखत. पण पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांच्यात मैत्री झाली. रुचिर हे मृणाल यांना कॉलेजमध्ये सिनियर होते.
रूचिर त्यांच्या एका नाटकातल्या भुमिकेसाठी एका मुलीच्या शोधात होते. त्यावेळी मृणाल ‘स्वामी’ या सुप्रसिद्ध झालेल्या मालिकेत काम करत होत्या. रूचिर यांना मृणाल यांना आपल्या नाटकातील भूमिकेसाठी विचारलं. त्यांनीही होकार दिला. कामानिमित्त सहवास वाढत गेला आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे त्यांनाच कळलं नाही. १० जून 1990 रोजी दोघांनीही लग्न केलं. लग्नाला बरीच वर्षे झाली, पण अजूनही या जोडप्याची केमिस्ट्री अजूनही अबाधित आहे.