‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) घराघरात पोहोचली. त्यानंतर तू तिथे मी, अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत तिने काम केलं. ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत काम करत असतानाच, मृणालने काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती ‘हे मन बावरे’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती. तूर्तास मृणाल मातृत्वाचा आनंद घेतेय. काही दिवसांआधीच तिने एका गोंडस मुलीचा जन्म दिला आहे. मृणालने आपल्या मुलीचं नाव नुरवी असं ठेवलं आहे. सध्या मृणाल नुरवीचं कोडकौतुक करण्यात दंग आहे. मृणालचा पती नीरज यालाही लेकीचे किती लाड करू नि किती नको, असं झालंय. एकंदर काय तर नुरवीच्या आगमनानं मृणाल व नीरजचं अख्ख आयुष्य बदललं आहे.
लेकीच्या येण्यानं मृणालचं आयुष्य किती बदललंय हे तिच्या पोस्टवरून लक्षात येतेय. नुकतीच मृणाल दुसानिसने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आपल्या पतीचा आणि लेकीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मृणालचा पती त्यांच्या लेकीला खेळवताना दिसून येत आहे. ‘आणि शेवटी नीरज बोलता झाला...नाहीतर घरात मी नाही बोलले तर कुणीच बोलत नाही.. भयंकर शांतता...पण आता सगळं बदलतंय ..,’अशी कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना मृणालने दिली आहे.
मृणालने 2016 मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर नीरज मोरेसोबत अरेंज मॅरेज केलं होतं. कांदेपोहेच्या कार्यक्रमात मृणाल आणि नीरज पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. नीरज अमेरिकेत राहात असून मृणाल देखील सध्या तिथेच असते. मृणालने 24 मार्चला मुलीला जन्म दिला.