Pandharpur Wari : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील राणी येसूबाईंच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या चर्चेत आहे ती विठुरायाच्या वारीमुळे. होय, आळंदी आणि पंढरपूर भक्तांनी गजबजून गेलं आहे. कोरोना महामारीनंतर संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी राज्यात पंढरपूरची वारी होत आहे. हरिनामाच्या गजरात अनेक भाविक पंढरपूरात दाखल होत आहेत. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ( Prajkta Gaikwad ) ही सुद्धा वारीत सहभागी झाली आहे.प्राजक्ताने वारीच्या वाटेवरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती वारकऱ्यांबरोबर पायी वारी करत हरिभजनात लीन झालेली दिसतेय. तुळशी वृंदावन डोक्यावर घेत विठूमाऊलीचा गजर करत, टाळ मृदुंगाच्या गजरात जय हरिनामाचा गरज करत तिनं पारंपरीक भजनांवर ठेकाही धरलेला आहे. ‘दोन वर्षानंतर वारी... आनंदी आनंद...,’असं वारीचा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिलं आहे.
प्राजक्ताचे वारीचे फोटो व व्हिडिओ पाहून चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा, कौतुकाचा वर्षाव केलाय. ‘ही एकच अशी अभिनेत्री आहे, जिचा खरंच अभिमान वाटतो,’ असं एका चाहत्याने लिहिलं आहे. ‘रखुमाई सारख्या दिसता’, असं तिचा फोटो पाहून एका चाहत्याने म्हटलं आहे. ‘मस्तच ताईसाहेब, हीच महाराष्ट्राची परंपरा आहे ताई,’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.