मराठी कलाविश्वातील गुणी आणि तितकीच सोज्वळ अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. चित्रपट, मालिका असा प्रवास करत प्रार्थना अल्पावधीत लोकप्रिय झाली. अलिकडेच ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत झळकली होती. त्यामुळे पुन्हा एकदा ती प्रकाशझोतात आली. प्रार्थना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून तिच्या नवनवीन पोस्टची कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. यामध्येच तिने एक पोस्ट शेअर करत बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.
प्रार्थना उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक दक्ष नागरिकदेखील आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती सामाजिक भान जपताना दिसते. अलिकडेच तिने जॅकी श्रॉफ यांच्यासोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हा कार्यक्रम झाल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यात तिने जॅकीदांचे आभार मानले आहेत.
प्रार्थनाने का मानले जॅकी श्रॉफचे आभार?
“थॅलेसीमिया हा एक असा आजार आहे जो मुलानं मध्ये जन्मापासूनच असतं. आणि जन्मल्याच्या 3 महिन्यानंतर त्याचे लक्षण दिसून येतात. तज्ज्ञ सांगतात की या आजारामध्ये बाळाच्या अंगात रक्ताची कमी होऊ लागते. जेणे करून त्याला बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता येते. वारंवार रक्त द्यावे लागल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोह तत्त्व जमा होतं जे पुढच्या आयुष्यात हृदयासाठी प्राणघातक ठरू शकतं. दरवर्षी 8 मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसीमिया दिन साजरा केला जातो. आणि आज ही संधी मला मिळाली….मला आज या कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल जॅकी श्रॉफ यांचे आभार. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश या दुर्मिळ आजाराबद्दल जनजागृती करणे हा आहे. चला थॅलेसीमिया विरुद्ध लढूया आणि रक्तदान करूया”, असं प्रार्थाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने साकारलेल्या नेहा या भूमिकेला प्रचंड प्रेम मिळालं. त्यामुळे या मालिकेनंतर पुन्हा एकदा प्रार्थनाला पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.