सध्या अनेक मराठी अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रींना आव्हान देत लोकप्रिय ठरत आहेत. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर या अभिनेत्री मराठीसोबतच हिंदी आणि इतर भाषांमध्येही स्वतःच्या अभिनयाची छाप पाडत आहेत. याच अभिनेत्रींमध्ये मराठमोळी प्रिया बापटही हिंदी ओटीटीविश्वात स्वतःच्या अभिनयाची छाप पाडत आहे. अशातच स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर प्रियाने IMDB लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत चांगलीच आघाडी घेतलीय.
प्रिया बापटने पटकावला हा क्रमांक
या आठवड्यात प्रिया बापटने आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. अलीकडेच तिची सिरिज 'रात जवान है’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा शो मुलांचे संगोपन करण्याच्या आव्हानांना सामोरी जाणाऱ्या तीन चांगल्या मित्रांच्या कथेवर केंद्रित आहे. प्रियाने विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. आपला आनंद व्यक्त करत प्रिया म्हणाली, "आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत या आठवड्यात मी दुसऱ्या क्रमांकावर आहे याचा मला खूप आनंद होतोय आणि यासाठी मी आयएमडीबीचे मनःपूर्वक आभार मानते. प्रत्येक कलाकाराचं टॅलेंट आणि मेहनत याला आयएमडीबीकडून मिळालेली हि एक पावती आहे. माझ्या सर्व चाहत्यांचे मी मनापासून आभार मानते जे माझ्यावर आणि मी केलेल्या कामावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या वर्षी असलेल्या माझ्या रिलीजेस साठी मी खूप उत्सुक आहे. हे सर्व रिलीजेस खूपच छान आहेत आणि त्यावर देखील प्रेक्षक आणि चाहते खूप प्रेम करतील अशी मला खात्री आहे."
या कलाकारांचीही आघाडी
दरम्यान, 'तुम्बाड' पुन्हा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये परत आणत नायक सोहम शाहने या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. विक्रांत मसेने आपल्या क्राइम ड्रामा चित्रपट ‘सेक्टर ३६’ च्या ओटीटी प्रीमियरनंतर या यादीत ९वे स्थान मिळविले आहे, तर त्याचा सहकलाकार दीपक डोबरियाल ३७व्या स्थानावर आहे. तृप्ती डिमरी आपल्या आगामी चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला वीडियो’ साठी ८व्या स्थानावर आहे. तिचा सहकलाकार राजकुमार राव २१व्या स्थानावर आहे. ईशान खट्टरने त्याचा पहिला क्रमांक सलग तिसऱ्या आठवड्यात कायम ठेवला आहे. तर ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर, शाहरुख खान आणि सलमान खान अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, सहाव्या आणि तेराव्या क्रमांकावर आहेत.