सध्या मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वातील विविध कलाकृतींमध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.प्रिया बापट सध्या हिंदीमध्ये एकापेक्षा एक वेबसीरिजमध्ये भूमिका साकारतेय. प्रिया बापटच्या नवीन वेबसीरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. या वेबसीरिजचं नाव 'जिंदगीनामा'. सहा छोट्या कथांच्या या वेबसीरिजमध्ये आदित्य सरपोतदार दिग्दर्शित एका कथेत प्रिया बापटने अभिनय केलाय. त्यावेळी तिला आलेला भावुक अनुभव तिने शेअर केलाय.
आईचं निधन झाल्यावर प्रियाचा पहिला प्रोजेक्ट
'जिंदगीनामा'च्या स्क्रीनिंगच्यावेळेस प्रिया बापटने हा अनुभव सांगितला की, "मी जी भूमिका साकारलीय त्या भूमिकेत खूप वाक्य नव्हती. त्यामुळे व्यक्तिरेखेवर झालेल्या आघाताचा अनुभव घेणं आणि ते व्यक्त करणं हे माझं काम होतं. पण हे आणखी कठीण झाले कारण शूटींग सुरु झाल्याच्या काही दिवस आधी माझ्या आईचं निधन झालं होतं. आईचं छत्र गमावल्यावर जिंदगीनामा हा माझा पहिला प्रोजेक्ट होता. त्यामुळे मला व्यक्तिरेखेच्या वेदना आणि दु:ख खोलवर जाणवले. तो क्षण मी जगतोय असे वाटले. सेटवर असताना मी कोणतीही वेगळी योजना बनवली नाही किंवा वेगळा अभिनय करण्याचा प्रयत्न केला नाही. ते फक्त माझ्याकडून घडले. मी शक्य होईल तितकं प्रामाणिकपणे इन द मूमेंट राहण्याचा प्रयत्न केला. ”
प्रिया बापटची नवी वेबसीरिज जिंदगीनामा
एमपॉवर द्वारे संकल्पित, ॲप्लॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि अँटीमॅटर निर्मित 'जिंदगीनामा' या वेबसीरिजमध्ये सहा वेगवेगळ्या कथा पाहायला मिळत आहेत. प्रिया बापट, श्वेता बसू प्रसाद, प्राजक्ता कोळी, यशस्विनी दायमा, लिलेट दुबे, श्रेयस तळपदे, अंजली पाटील, सुमीत व्यास, इवांका दास, मोहम्मद समद, शिवानी रघुवंशी, सायंदीप सेनगुप्ता, तन्मय धनानिया आणि श्रुती धनानिया या कलाकारांनी या वेबसीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सोनी लिव्हवर ही वेबसीरिज बघू शकता.