मराठी कलाविश्वातील उत्साही आणि तितकीच दमदार अभिनयशैली असलेली अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. काकस्पर्श, हॅपी जर्नी, आम्ही दोघी, वजनदार यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात अभिनय करुन प्रियाने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. नाटकापासून सुरु झालेला प्रियाचा प्रवास आता वेबसीरिजपर्यंत येऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे या प्रवासात प्रियाला एका बॉलिवूडसिनेमाचीही ऑफर आली होती. मात्र, या सिनेमासाठी तिने नकार दिला.
प्रियाने मराठीसह लगे रहो मुन्नाभाई, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या हिंदी चित्रपटात काम केले आहे. या सिनेमाप्रमाणेच तिला शाहरुखच्या चक दे इंडिया या सिनेमाचीही ऑफर आली होती. या सिनेमात ती एका हॉकी प्लेअरच्या भूमिकेत दिसणार होती. मात्र, ही ऑफर प्रियाने नाकारली.
नेमका का दिला प्रियाने सिनेमासाठी नकार
"काही वर्षांपूर्वी प्रियाने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने या सिनेमाच्या ऑफरविषयी भाष्य केलं. ''मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये भूमिका साकारल्यानंतर मला कितीतरी हिंदी फिल्म्सच्या ऑफर्स येत होत्या. त्यात मला चक दे इंडियाचीही ऑफर आली होती. पण, त्यावेळी माझं ग्रॅज्युएशनचं वर्ष असल्यामुळे मी या सिनेमासाठी नकार दिला. त्या काळात माझ्यासाठी माझा अभ्यास जास्त महत्त्वाचा होता. मला माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनही पूर्ण करायचं होतं", असं प्रिया म्हणाली.
पुढे ती म्हणते, "अखेर पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर मी हे क्षेत्र करिअर म्हणून निवडलं. 'चक दे' ही खरंच मोठी ऑफर होती. तो चित्रपट स्वीकारणं म्हणजे शाहरुख खानबरोबर तीन महिने काम करण्याची संधी मिळाली असती. पण मी कसलाही विचार न करता, एकाच फटक्यात नाही म्हणून टाकलं. या चित्रपटासाठी तीन महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार होतं आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये तीन महिने शूटिंग होणार होतं. ग्रॅज्युएशनचे वर्षं असल्याने तितका वेळ देणे माझ्यासाठी शक्य नव्हतं. ''