अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी प्राजक्ता माळी सध्या तिच्या 'फुलवंती' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात पहिल्यांदाच प्राजक्ता मुख्य भूमिकेत दिसली आहे. तर या सिनेमातून तिने निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. प्राजक्ताने या सिनेमात 'फुलवंती'ची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं आणि नृत्याचंही कौतुक होत आहे. प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा पाहून मराठी अभिनेत्री भारावून गेली आहे.
मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका राधिका देशपांडे हिने 'फुलवंती' पाहिल्यानंतर प्राजक्तासाठी भली मोठी पोस्ट लिहिली आहे. प्राजक्ताचा अभिनय आणि डान्स पाहून अभिनेत्री थक्क झाली आहे. या पोस्टमधून तिने प्राजक्ताचं कौतुक केलं आहे.
राधिका देशपांडेची प्राजक्तासाठी पोस्ट
माझ्या प्राजक्तफुला!
मदन मंजिरी, सुबक ठेंगणी, चटक चांदणी प्राजक्ता लखलखते आहे सोनेरी पडद्यावर.
“तुम्ही जरा बघा तरी” असं म्हणत प्राजक्ताचा तोरा लक्ष वेधून घेतो, आकृष्ट करून घेतो.
प्राजक्ता तुझ्यासाठी म्हणून मी हा चित्रपट बघायला गेले. अर्थात इतरही कारणं होतीच. भट्टी जमून आलेल्या, पंचतारांकित अभिनेता, अभिनेत्री, तंत्रज्ञ असलेला चित्रपट हुकवायचा म्हणजे प्रेक्षकांचे नुकसानच.
मला माझ्या वॉलवर खास करून तुझ्यावर लिहावं वाटलं म्हणून हा लेख. साधारण १२ वर्ष झाली. तुझाही एक तप पूर्ण झाला असेल. एका ऑडिशनला तू पण आली होतीस. एकदम साधी, नो attitude असलेली तू मला तेव्हाच आवडली. मी पण त्याच serial मध्ये काम केलं होतं...“सुवासिनी”. पण माझा रोल संपला आणि तुझी एन्ट्री झाली. त्यामुळे आपण एकत्र काम केलं नाही. तू माझ्या नणंदेबरोबर नृत्यात MA केलं असल्याचं कळलं.
“रोटी दो” ह्या समाज कार्यासाठी आपण एक व्हिडिओ केला, तेव्हा तू भेटलीस आणि आपल्या गप्पा झाल्या. मग तुझी प्रगती बघत आले आहे मी आणि टप्प्याटप्प्याने आपलं मेसेजवर बोलणं होत आलं आहे. मला तेव्हाही तुझं कौतुक वाटे आणि आजही आहे. हिच्यात काहीतरी आहे. वेगळीच आग आहे हिच्यात. पण तू तेवढीच शांत ही आहेस, देवापुढे लावलेल्या समयी प्रमाणे.
तुझा आज ‘प्राजक्तराज‘ हा ब्रँड पॉप्युलर आहे. तू आता निर्मातीही आहेस. ‘फूलवंती‘ तर तू आधीपासूनच आहेस. त्याची इच्छापूर्ती आत्ता झाली असं मी म्हणेन. एवढं सगळं असणं सोप्पं नाही गं! सोप्पा नसेलच तुझा हा एकटीच प्रवास. सोबत असतात सगळे... पण, तू तुझी नाव चंदेरी समुद्रात सोडल्यावर, आडव्या तिडव्या लाटांमधून सरकवत, ओढत, ढकलत नेलीस. प्रत्येक लाटेला जणू टाळी देत पुढे जात राहिलीस.
टीकाकार टीका करतील, अगदी ह्या लेखाचीसुद्धा. इंडस्ट्रीतल्या समकालीन नटीबद्दल लिहिते आहे म्हटल्यावर काहींना ‘माझा काय स्वार्थ असेल‘ असं ही वाटून जाईल. पण तुझ्या आणि माझ्यात एक समान दुवा आहे. आपण दोघीही गुरुबंधू. श्री श्री रविशंकर ह्यांच्या शिष्या.
चित्रपट देखणा आहे. मांडणी सुंदर आहे. प्राजक्ता, तू खूप सुंदर दिसली आहेस. प्रेक्षक जाणारच तुला पाहायला. प्राजक्ताच्या फुलाचं एक वैशिष्ट्य असतं. ते कोमेजून जरी गेले तरी त्यांचा सुगंध दरवळत राहतो. मतितार्थ असा की चित्रपट सिनेमागृहातच जाऊन बघा. कारण त्यानंतर सुगंध मिळेलच. पण फूल हातात पडण्याची मजा, ती कशी मिळवाल? मैत्रिणी तुझा ह्या चित्रपटात घरंदाज ‘साज‘ आहे. अनेक उत्तम शुभेच्छा. जय गुरुदेव!
प्राजक्ता मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा ११ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. तर प्रदर्शनाआधीच 'फुलवंती' सिनेमातील गाणीही हिट झाली. या सिनेमाचं दिग्दर्शन स्नेहल तरडेंनी केलं आहे. या सिनेमात प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी, प्रसाद ओक, वैभव मांगले, स्नेहल तरडे, हृषिकेश जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सिनेमातील कलाकारही या सिनेमात झळकले आहेत.