Join us  

...तेव्हा रामललासाठी, कारसेवकांसाठी आजी-आजोबा रडले होते; मराठी अभिनेत्रीने सांगितलं 'राम ऋण'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 1:31 PM

राधिका देशपांडेने अयोध्या राम मंदिराबद्दल तिच्या आजी - आजोबांचा एक भावनिक किस्सा सांगितलाय. तुम्हीही वाचा

२२ जानेवारीला अयोध्याराम मंदिराचा (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला. संपूर्ण देशात राम मंदिर सोहळ्याचा उत्सव साजरा झाला. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. देशभरातील सर्वांनी २२ जानेवारीला रामललाची प्रतिष्ठापना झाल्यावर आनंद साजरा केला. अशातच 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) फेम मराठमोळी अभिनेत्री राधिका देशपांडेने अयोध्या राम मंदिराबद्दल भावनिक किस्सा सांगितला आहे.

राधिकाने तिच्या बालपणीचा फॅमिली फोटो आणि अयोध्येतील राम ललाचा फोटो पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करुन राधिका लिहीते, "आजी आजोबा रडले होते कार सेवकांसाठी, अयोध्येतल्या राम ललाला टेंट मधे राहावं लागतं आहे म्हणून. त्यांच्या डोळ्यात स्वप्न होतं ते राम मंदिराचं. आज आजी आजोबा नाहीत पण त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. २२ जानेवारी चा तो क्षण! मी ढसाढसा रडले. जणू माझ्या पूर्वजांचे अश्रू माझ्या डोळ्यातून वाहत होते.

राधिका पुढे लिहीते, "झालं गेलं विसरून जा असं सांगण्याची पद्धत आहे आपल्याकडे. पण पितृऋण विसरायचं नसतं. रामाच्या ऋणात आहोत आम्ही सगळेच. आमचं भाग्य की आम्हाला प्राणप्रतिष्ठा पाहता आली. काल एक महिना झाला. स्वप्नं मनापासून पाहिली की ती पूर्ण होतातच. रामनाम मुखी अखंड राहो." राधिकाच्या या पोस्टवर अनेकांनी तिचं कौतुक केलं. 

टॅग्स :अयोध्याराम मंदिरमराठी