Join us

नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने आणला दुराव्याचा 'अंतरपाट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 15:52 IST

Antarpaat: नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळत आहे. यात नव्या धाटणीच्या आणि कथानकाच्या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कलर्स मराठीवर सध्या  'इंद्रायणी', 'सुख कळले', 'हसताय ना, हसायलाच पाहिजे! ’ हा नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यामध्येच आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे.

कलर्स मराठीवर दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात अबीर गुलाल या मालिकेचा टीझर नुकताच रिलीज झाला. त्यानंतर आता अंतरपाट ही नवी मालिकाही लवकरच प्रसारित होणार आहे. नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये हळदीचा समारंभ सुरू असल्याचं दिसून येत आहे. उल्हासित, आनंदी वातावरण, लग्नाची लगबग, सजलेले घर, पाहुण्यांचा वावर असं या प्रोमोमध्ये दिसून येत आहे. लव्ह मॅरेजच्या काळात अरेन्ज मॅरेज करणाऱ्या गौतमीला परफेक्ट जोडीदार मिळाल्याने ती अतिशय आनंदी आहे. गौतमीला आपल्या जोडीदारासोबत प्रत्येक स्वप्नं पूर्ण करायचे आहे. पण, तिची स्वप्न पूर्ण करायला तिचा नवरा क्षितीज तिची साथ देईल का?

गौतमीला वाटतेय की, क्षितिज हा सर्वोत्तम आणि परिपूर्ण असा नवरा आहे, जसा तिला हवा होता, अगदी तसा. पण खरंच  क्षितीज या लग्नामुळे खुश आहे का? काय लिहिलंय गौतमीच्या नशिबात?  नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने आणला दुराव्याचा अंतरपाट! दरम्यान, या नव्या मालिकेत रश्मी अनपट, रेशम टिपणीस ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकाररश्मी अनपटरेशम टिपणीस