कमी वयात अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु (rinku rajguru). पहिल्याच सिनेमातून मराठीसह बॉलिवूडलाही सैराट करुन सोडणाऱ्या रिंकूने आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, तिच्या सैराटची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. या सिनेमाविषयी नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते. सध्या चाहत्यांमध्ये रिंकूने या सिनेमासाठी किती मानधन घेतलं आणि त्या मानधनाचं तिने काय केलं याविषयी चर्चा रंगली आहे.
रिंकूने 'लोकमत फिल्मी'च्या 'माय फर्स्ट' या सेगमेंटमध्ये तिच्याशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तिने सैराटमधून मिळालेल्या मानधनाचं काय केलं होतं हे सांगितलं. विशेष म्हणजे रिंकूने तिच्या पहिल्या पगारात अशी गोष्ट खरेदी केली जे पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं.
"तू तुझ्या पहिल्या स्व कमाईतून घेतलेली पहिली वस्तू कोणती? असा प्रश्न रिंकूला विचारण्यात आला. त्यावर, तिने दिलेल्या उत्तरामुळे तिने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकून घेतली. सैराटमधून मला जे पैसे, म्हणजे जो पगार मिळाला होता. त्यातून मी १० वीची पुस्तक खरेदी केली होती", असं उत्तर रिंकूने दिलं.
रिंकूला कुटुंबाकडून शैक्षणिक वारसा मिळालेला आहे. रिंकूचे वडील महादेव राजगुरु हे स्वत: एक शिक्षक आहेत. त्यामुळे तिच्यावर देखील त्याच पद्धतीचे संस्कार झाले आहेत. म्हणूनच सैराटमधून मिळालेल्या पहिल्या पगारात तिने शाळेची पुस्तक खरेदी केली. रिंकूने कुठेही वायफळ खर्च न करता ते पैसे सत्कारणी लावले हे ऐकून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, रिंकूला सैराट या सिनेमासाठी ४ लाख रुपये मानधन देण्यात आलं होतं. ४ लाख रुपये देऊन तिला सैराटसाठी करारबद्ध करण्यात आल्याचं म्हटलं जातं. मात्र, या मानधनाविषयी अद्याप कोणतीही ठोस माहिती नाही. वा रिंकूनेही त्याविषयी कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे तिला नेमकं किती मानधन मिळालं होतं याबाबत साशंकताच असल्याचं म्हटलं जातं.