'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) फेम यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुख (Abhishek Deshmukh) आज वाढदिवस साजरा करत आहे. या मालिकेमुळे यशला वेगळी ओळख मिळाली आहे आणि तो घराघरात पोहचला आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त मालिकेतील सहअभिनेत्री रुपाली भोसलेने(Rupali Bhosle) अभिषेकसाठी खास पोस्ट लिहिली आहे. सेटवर झालेली पहिली भेट ते आजपर्यंतची त्यांची मैत्री याचं वर्णन रुपालीने पोस्टमधून केलं आहे.
अभिनेत्री रुपाली भोसलेने 'बर्थडे बॉय' अभिषेकसोबतचे फोटो शेअर केले आहेत. ती लिहिते,"हॅपी बर्थडे अभिषेक. आई कुठे काय करते च्या सेटवर पहिल्या दिवशी माझं अगदी सकारात्मकतेने आणि प्रेमाने स्वागत करणारा अभिषेक पहिला होता. तेव्हापासून आमच्यात छान मैत्री झाली जी आजही आहे. तो चांगलाच खोडकर आहे पण त्याच्या खोड्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतात. दोस्तो का दोस्त है और दुष्मनो का भी दोस्त है तू(तुला माझी रिअॅक्शन दिसलीच असेल इथे सुद्धा). तू खूप सकारात्मक आहेस हेच तुझं वेगळेपण आहे. खूप मेहनती आहेस, खूप काम कर आणि खूप खूप मोठा हो. जसा आहेस तसाच राहा आणि तुझ्यातलं लहानपण कायम राहू दे. बाप्पा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच त्याच्याकडे प्रार्थना. पु्न्हा एकदा हॅपी बर्थडे माय डिसेंबर पार्टनर. लक्षात ठेव तू माझ्यापेक्षा १५ दिवसांनी मोठा आहेस."
अभिषेक देशमुख 'आई कुठे काय करते' मालिकेमुळे टीव्हीवरचा लोकप्रिय अभिनेता बनला आहे. शिवाय तो लेखकही आहे. त्याने २०१६ साली 'पसंत आहे मुलगी' मालिकेतही भूमिका साकारली होती. तर 2018 साली आलेल्या 'होम स्वीट होम' सिनेमात तो झळकला. नुकतीच लग्नबंधनात अडकलेली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री अमृता देशमुख ही त्याची सख्खी बहीण आहे.