Join us

"बायकांनी घरीच राहिलं पाहिजे" म्हणणाऱ्या हिंदी मालिकेच्या निर्मात्याला मराठी अभिनेत्रीने दाखवला इंगा, म्हणाली...

By कोमल खांबे | Updated: March 25, 2025 14:11 IST

"मी त्याला म्हणाले माझी साडी नेस आणि शूट कर", मराठी अभिनेत्रीने सांगितला हिंदी मालिकेचा अनुभव

'पुढचं पाऊल', 'माझ्या नवऱ्याची बायको' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून अभिनेत्री शर्मिला शिंदे घराघरात पोहोचली. सध्या शर्मिला 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत दुर्गाची भूमिका साकारत आहे. हिंदी टेलिव्हिजनवरही शर्मिला झळकली आहे. मात्र हिंदी मालिकेच्या सेटवर शर्मिलाला विचित्र अनुभव आला. मालिकेच्या निर्मात्याने सेटवरील अभिनेत्रीला हिणवल्यानंतर शर्मिलाने त्याला चांगलाच धडा शिकवला. 

शर्मिलाने मराठी मनोरंजनविश्व या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिचा हा अनुभव सांगितला. ती म्हणाली, "हिंदी मालिकेच्या सेटवर युपीकडचे निर्माते खूप असतात. त्या मालिकेच्या सेटवर खूप धूळ असायची आणि चाळीतील घर असल्यामुळे आम्ही चप्पल घालायचो नाही. आणि तिथला स्टुडिओवालाही नीट साफसफाई करायचा नाही. त्या धुळीतच आम्ही बसायचो. चप्पल न घालता चालल्यामुळे त्या धुळीमुळे पाय खूप खराब होत होते. त्याला १०० वेळा सांगून झालं होतं. त्यामुळे मी काहीच न बोलता लांब बसले होते". 

"एका रात्रीचे किती घेशील?", मराठी अभिनेत्रीला इंडस्ट्रीत आला वाईट अनुभव, म्हणाली- "C ग्रेडच्या सिनेमात..."

"मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री त्यादिवशी खूप त्रासली होती. आणि निर्मात्याला सांगत होती की इथे त्रास होतोय. माझे पाय बघा वगैरे असं ती म्हणत होती. ती जवळजवळ रडायला आली होती. तेव्हा तो निर्माता जोरात म्हणाला की यासाठीच आपले पूर्वज सांगतात की महिलांनी घरीच राहिलं पाहिजे. मी इतका वेळ गप्प होते. पण त्याचं हे वाक्य ऐकताच मी तिथून उठले आणि त्याला विचारलं काय म्हणालात तुम्ही? बायकांनी घरात राहिलं पाहिजे? ठिक आहे उद्यापासून कोणतीही महिला कलाकार सेटवर येणार नाही. तुम्ही प्रोडक्शनवाले उद्यापासून साडी नेसा आणि शूट करा. कारण, हे तुम्ही कसं काय म्हणू शकता? तुमचं घर आमच्यामुळे चालतंय. कारण, टेलिव्हिजन हे महिलांमुळे चालतं", असं तिने सांगितलं.

पुढे ती म्हणाली, "माझ्या सगळ्या पुरुष सहकलाकारांचा आदर ठेवून मी हे सांगत आहे की हे खरं आहे. हा तिकडून इकडे महाराष्ट्रात मुंबईत येऊन आम्हाला सांगतोय. म्हणून मी त्याला म्हटलं की उद्यापासून आम्ही कोणीच येणार नाही. तू माझी साडी नेसून माझा सीन कर. त्यानंतर ते प्रकरण खूप मोठं झालं आणि मग मुख्य निर्मात्यांकडे गेल्यावर त्याने मग आम्हाला सॉरी म्हटलं होतं. मराठी शूटिंग सेटवर असं कधीच होत नाही". 

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठी