दाक्षिणात्य अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. तिने आजवर अनेक सुपरहिट सिनेमांत काम करून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं आहे. अभिनयाबरोबरच मृणालच्या सौंदर्याचेही चाहते आहेत. अनेकांची ती क्रशही आहे. अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या मृणालचं मराठमोळी अभिनेत्री शिल्पा तुळसकरबरोबर खास नातं आहे. शिल्पाने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन मृणालबरोबरचा एक गोड फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत शिल्पाने तिच्याबरोबरचं नातं सांगणारी आणि तिचं कौतुक करणारी भली मोठी पोस्टही लिहिली आहे. ती म्हणते, "तू खूप खास आहेस. मी तुला कोणाबरोबरही शेअर करू शकत नाही. पण, मला प्रत्येकाला हे सांगावंसं वाटतं की उत्कृष्टरित्या तू स्वत:ला कलाकार म्हणून घडवलं आहे. तू हे सगळं सहज करतेस असं वाटतं. पण, मी तुझी मेहनत पाहिली आहे. या नॉटी गर्लला मी काही वर्षांपूर्वी भेटले. तुला जे हवं ते सगळं मिळो, अशी देवाकडे प्रार्थना करते. उंच भरारी घे."
शिल्पा तुळसकरच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टवर अभिनेत्री अभिज्ञा भावेने कमेंट करत "माहीत नाही का पण मला jealous फिल होतंय" असं म्हटलं आहे. चाहत्यांनीही शिल्पाच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. शिल्पा आणि मृणालने 'हाय नाना' या तमिळ सिनेमात एकत्र काम केलं आहे. ७ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.