मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे (Shweta Shinde) गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत काम करत आहे. 'चार दिवस सासूचे' सारख्या सुपरहिट मालिकांपासून आपण तिला पाहिलं आहे. फक्त अभिनयच नाही तर श्वेता निर्मिती आणि दिग्दर्शनातही आहे. श्वेताने नुकतंच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये तिने प्रेग्नंसीच्या वेळेसचा अनुभव सांगितला.
श्वेतासाठी काम नेहमीच प्राधान्य राहिलं. लग्नानंतरही ती आधीसारखंच भरपूर काम करत होती. त्यामुळे लग्नामुळे तिच्या कामात कोणताच अडथळा आला नाही. पण ती गरोदर राहिली तेव्हा तिच्या काय भावना होत्या याबद्दल नुकतंच तिने आरपार या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
ती म्हणाली, 'माझ्या आयुष्यात खरा बदल झाला जेव्हा मी गरोदर राहिले. कारण मी बेडरेस्टवर होते. त्यानंतर माझं असं झालं की बापरे आता संपलं सगळं. त्यावेळी माझी फेज खूप विचित्र होती. म्हणजे प्रेग्नंसी हा किती आनंदाचा विषय आहे पण तो माझ्यासाठी आनंदाचा नव्हता. मला असं वाटलं मी का प्रेग्नंट झाले. आता माझी सगळी कामं जाणार. म्हणजे विचार करा मी किती वर्कोहॉलिक होते. मला ते सहन होईना.'
ती पुढे म्हणाली,'तेव्हा फू बाई फू् पहिला सिझन येणार होता. अशा काही गोष्टी ज्या ऑफर होत होत्या त्याला नाही म्हणावं लागत होतं. हातातले प्रोजेक्ट्स रद्द करावे लागले. मला यामुळे डिप्रेशन आलं. मी काऊंसेलिंग केलं. त्यांनी मला टीव्ही पूर्णपणे बंद करायला सांगितला. पुस्तकं वाचायला सांगितली. पुस्तकांनी मला वेगळा दृष्टिकोन दिला. प्रेग्नंसीबाबत निगेटिव्ह विचार करणारी मी नंतर पॉझिटिव्ह झाले होते. लेक वामिकाला पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा मला असं झालं की मी काय विचार करत होते.'