गेल्या काही वर्षांमध्ये मराठी कलाकारांचा बॉलिवूडमधील (bollywood) वावर वाढला आहे. सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav) , सई ताम्हणकर (sai tamhankar), अनुजा साठे (anuja sathe), वनिता खरात (vanita kharat) यांसारखे अनेक कलाकार सातत्याने बॉलिवूडसिनेमा, वेबसीरिजमध्ये झळकत आहेत. विशेष म्हणजे या कलाकारांच्या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. 'चला हवा येऊ द्या' या गाजलेल्या कार्यक्रमातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. शाहिदच्या (shahid kapoor) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'तेरी बातों मैं उल्झा जिया' या सिनेमात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
स्नेहल शिदम (snehal shidam) हे नाव आता कोणासाठीही नवीन राहिलेलं नाही. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. विशेष म्हणजे आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या स्नेहलने चक्क बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. शाहिद कपूरचा नुकताच रिलीज झालेला तेरी बातों मैं उल्झा जिया या सिनेमामध्ये तिने काम केलं आहे. स्नेहलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे.
"कळवायला उशीर आणि आनंद दोन्हीही होतोय. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांचा नवा हिंदी चित्रपट "तेरी बातो में ऐसा उलझा जिया" नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात माझी एक छोटीशी भूमिका आहे. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा चित्रपट आणि कसा वाटतोय ते सांगा. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असच राहुद्या..." असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. सोबतच तिने शाहिदसोबतचा फोटोही शेअर केला आहे.
दरम्यान, स्नेहलने ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर तिच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. स्नेहलने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमासोबतच 'देवमाणूस २', 'माझा होशील ना', 'भागो मोहन प्यारे' सारख्या मालिकांमध्ये आणि 'बॉईज ३' या सिनेमात काम केलं आहे.