महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज ( २ जुलै) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल ९ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे. अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळासह सामान्यांमध्ये या एकाच घटनेची चर्चा रंगली आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण याविषयी भाष्य करत आहेत. यावर आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीं हिची याच संदर्भातील इन्स्टा स्टोरी व्हायरल होतेय.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकरांपैकी एक आहे. सोनालीने आपल्या चाहत्यांना इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून राज्यातील राजकीय घडामोडींविषयी प्रश्न विचारला. ''पाऊस आणि भूकंप एकत्र? हे चाललंय तरी काय?'' असा प्रश्न विचारतं रिअॅक्ट बारमध्ये ‘मजाक’ लिहित ही स्टोरी शेअर केली आहे.
सोनाली कुलकर्णीशिवाय तेजस्विनी पंडित, सुबोध भावे, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे लेखक सचिन गोस्वामी अनेक मराठी कलाकारांनी आज घडलेल्या राजकीय घडामोडीवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणी त्यांचं मत मांडलं. "महाराष्ट्रात सर्व पक्षीय राजवट..भा ज पा,राष्ट्रवादी, शिवसेना आणि भा ज पा तील काँग्रेसी नेते एकत्र येऊन महाराष्ट्र घडवणार... (मतदारांची ऐशी तैशी..नैतिकतेच्या आईचा घो....)", अशी पोस्ट सचिन यांनी शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात मोठा बंड केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला उधाण आलं आहे.