Join us

'मूल झाल्यानंतर परत २ वर्षाचा ब्रेक..'; पहिल्यांदाच वैयक्तिक आयुष्यावर स्पृहाने मांडलं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 16:20 IST

Spruha joshi: स्पृहाने पहिल्यांदाच तिच्या खासगी आयुष्याविषयी भाष्य केलं. यावेळी तिने तिच्या मातृत्वाविषयी सुद्धा मत मांडलं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी (spruha joshi). केवळ अभिनेत्री इतकीच स्पृहाची ओळख मिर्यादित नसून ती उत्तम सूत्रसंचालिका आणि कवयित्री सुद्धा आहे. त्यामुळे कलाविश्वात आणि सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते. स्पृहा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. यामध्येच अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या फॅमेली प्लॅनिंग आणि बाळ यांच्याविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं.

स्पृहाने नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या व्यावसायिक आणि खासगी जीवनावर भाष्य केलं. अलिकडच्या अनेक अभिनेत्रींनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. आजची पिढी असा विचार का करते? असा प्रश्न स्पृहाला विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिलं.

काय म्हणाली स्पृहा?

"या सगळ्या गोष्टी फार वैयक्तिक आहेत. त्यामुळे त्यात काय चूक काय बरोबर, याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. माझ्या अशा अनेक मैत्रिणी आहेत ज्यांना बाळ आहे आणि त्या बाळ झाल्यानंतरही त्यांचं करिअर उत्तमरित्या करत आहेत. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण घ्यायचं झालं तर गिरीजा ओक, आरती.  यांनी बाळ झाल्यानंतरही इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा काम करायला सुरुवात केली. काहींचे विचार याच्या उलट असतात. माझ्या बाबती असं झाली की, मी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काम करत होते. काम उत्तम सुरु असताना मध्येच ब्रेक घेऊयात असं मला आणि वरदला जाणवलं नाही," असं स्पृहा म्हणाली.

पुढे ती म्हणते," बाळाचा निर्णय हा आमचा एकत्र ठरवून घेतलेला निर्णय आहे. सध्याच्या काळात प्रत्येकाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. माझ्या जन्माच्या वेळी माझ्या आईचं वय २३ होतं. या उलट मी २३ वर्षांची असताना रोज १२-१२ तास शूट करत होते. त्यामुळे तेव्हा काम थांबवावं असं मला वाटलं नाही.आणि, आताही ब्रेक घ्यावासा वाटत नाही. मूल झाल्यानंतर परत २ वर्षाचा ब्रेक असेल, पुढे काम मिळेल की नाही, असा कोणताही विचार त्यामागे नाही. सुदैवाने मला दोन्ही कुटुंबाकडून छान साथ मिळाली. सासर आणि माहेर या दोन्हीकडून आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलंय. आमचं असंही काहीच नाहीये की, कधीच मूल नकोय. अलिकडच्या काळात सगळ्या गोष्टी वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीने पूर्वीपेक्षा फार पुढे गेल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे आता एक चॉइस आहे. त्यामुळेच ठराविक वयात ठराविक गोष्टी झालेल्या बऱ्या असं म्हटलं जायचं. पण, आता गोष्टी बदलल्या आहेत.”

टॅग्स :स्पृहा जोशीसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन