Join us

बाबांसाठी अभिनेत्री स्पृहा जोशीने लिहली मनाला भिडणारी सुंदर कविता, एकदा अवश्य वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 3:24 PM

लवकरच स्पृहा हिचा नवा कोरा 'शक्तिमान' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठी अभिनेत्री, कवयित्री आणि सूत्रसंचालिका अशा अनेक भूमिकांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी (Spruha Joshi ). तिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीच. दमदार अभिनयाच्या जोरावर स्पृहाने मनोरंजन सृष्टीत एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.  लवकरच स्पृहा हिचा नवा कोरा 'शक्तिमान' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात ती अभिनेता आदिनाथ कोठोरेसोबत झळकणार आहे.  त्यामुळे सध्या ती चर्चेत येत आहे. यातच स्पृहाच्या एका कवितेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

  स्पृहाने बाबांसाठी एक सुंदर कविता लिहली आहे. 'शक्तिमान' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्पृहा जोशीआदिनाथ कोठारे यांनी नुकतेच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीच्या स्पृहाने बाबांसाठी लिहिलेली सुंदर कविता सादर केली. स्पृहाच्या या कवितेचं नाव 'आभाळ' असं आहे. तर 'आभाळ' म्हणजे 'बाबा' असं इमॅजिन करा, असं कविता सादर करताना स्पृहा म्हणाली. 

 स्पृहाने सादर केलेली कविता

 

गच्च काळ्या ढगांनी भरलेलं काळंकुट्ट आभाळ, भीती वाटते त्याची कधी कधी, 

सारं आसमंत व्यापून टाकलेलं असतं त्याने, पळणारं तरी कुठे आपण त्याच्यापासून? 

त्याने डोळे उघडले तर लक्ष लक्ष एकदाच? फोडून काढलं तर पावसाच्या चाबकाने? 

विजेचा तिसरा डोळा भयकारी रागामध्ये, आगीत लपेटून टाकेल आपल्याला.

 जीव मुठीत धरून आपलं क्षुद्र जगणं जगत राहणं, एवढंच आपल्या हातात, 

त्याच्या डोळ्याला डोळे भिडवायची काय, मान वर करून पाहण्याची सुद्धा हिंमत नाही.

 सृष्टीच्या आतलं काहूर जाणवतं असतं खरंतर, तिची इच्छा असते, आपला संवाद घडावा आभाळाशी…

पण तीही मुक्याने कडू सत्य पचवत राहते…आतले कण आतमध्येच दाबत राहते…

 हळूहळू अंतर वाढतं, वाढतच जात…क्रांती करायला लागत मन, वाढत्या वयानुसार…

 आभाळाचं अस्तित्वच झुगारून द्यायला लागतं…धाडस करतं त्याला नजरेला नजर देण्याचं, ताठ मानेने त्याच्या समोर उभं राहण्याचं…

आता हळूहळू आभाळही म्हातारं व्हायला लागतं, वयानुसार अनुभवाने निवळायला लागतं, 

अशीच कधी नजरं जेव्हा आभाळावर जाते, काळेभोर क्रद्ध ढग निघून गेलेले असतात…

आभाळाच्या वृद्ध नजरेत वेगळेच भाव दिसतात. शांत निरभ्र आभाळ तेव्हा कौतुकाने पाहतं,

 काहीतरी आपल्या मनात उगाच दाटून येतं. हात पसरून, वय विसरून आपण मोठे होतो, 

थकलेल्या आभाळाला मायेने कवेत घेतो. आभाळाच्या डोळ्यांत तेव्हा आनंदाश्रु दाटून येतात, सुरकुतलेल्या सृष्टीचे कातर क्षण जागे होतात.

 

स्पृहाची ही डोळे ओलावणारी कविता सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली आहे. चाहते तिच्या कवितेचं भरभरुन कौतूक करत आहेत.  स्पृहाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास स्पृहा 'शक्तीमान' हा सिनेमा  २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यासोबत स्पृहा सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुख कळले' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीले येते. शिवाय तिच्या रंगभूमीवरील 'स्पृहा व्हाया संकर्षण' या कार्यक्रमाचेही संपुर्ण महाराष्ट्रात प्रयोग होतात. फक्त महाराष्ट्रातच नाही तर विदेशातही  कार्यक्रमाचे प्रयोग होतात आणि प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देतात.   

टॅग्स :स्पृहा जोशीसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाआदिनाथ कोठारेसोशल मीडिया