अभिनयाचा दांडगा अनुभव असलेली अभिनेत्री म्हणजे सुकन्या मोने-कुलकर्णी (sukanya kulkarni-mone). कसदार अभिनयशैली यांच्या जोरावर सुकन्या या गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी कलाविश्वावर राज्य करत आहेत. त्यामुळेच नाटक, मालिका आणि सिनेमा अशा सगळ्याच ठिकाणी त्यांचा वावर असल्याचं पाहायला मिळतो. अलिकडेच त्यांचा 'बाईपण भारी देवा' (baipan bhari deva) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे त्या सातत्याने चर्चेत येत आहेत. यामध्येच त्यांनी एका मुलाखतीत मालिका विश्वाविषयी भाष्य केलं आहे.
सुकन्या मोने यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीत झालेल्या बदलाविषयी भाष्य केलं आहे. मालिका विश्वाला इंडस्ट्रीचा दर्जा का दिला जात नाही हे त्यांनी सांगितलं. सोबतच इथे पीएफ, सिक लिव्ह काहीही मिळत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
मालिका विश्वाला इंडस्ट्रीचा दर्जा मिळत नाही अशी चर्चा होते. तर असं का होतं? असा प्रश्न सुकन्या कुलकर्णी यांना विचारण्यात आला होता. त्यावर इंडस्ट्री नुसती नावालाच आहे. इथे पीएफ, सिक लिव्ह काही मिळत नाही. मोजके निर्माते आहेत जे कलाकार-तंत्रज्ञांचा विचार करतात. मुळात वाहिन्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. सगळ्या युनिटला १५ दिवसातून एकदा सुट्टी दिली पाहिजे, असं सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, सरसकट निर्मात्यांचीच चूक असते असं मी म्हणणार नाही. कारण, नवीन निर्मात्यांकडे जर निधीच नसेल तर ते तरी काय करणार? अचानकपणे कथेला वेगळं दिलं जातं, कलाकार, सेट, वेशभूषा बदलली जाते. तीन महिन्यातच मालिका बंद करायला सांगितली जाते. त्यामुळे नवीन निर्माते बिथरतात. मग तो उभा कसा राहणार?
दरम्यान, अलिकडेच सुकन्या कुलकर्णी बाईपण भारी देवा या सिनेमात झळकल्या होत्या. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या सिनेमाच्या निमित्ताने सुकन्या यांनी त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा उलगडा केला.