Join us

'क्रू' मध्ये झळकली 'ही' मराठमोळी अभिनेत्री; करीना, तब्बू अन् क्रितीचीही उडाली घाबरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 10:57 IST

मराठमोळ्या अभिनेत्रीची बॉलिवूडमध्ये हवा

बॉलिवूडमध्ये नुकताच तीन ग्लॅमरस अभिनेत्रींचा 'क्रू' (Crew) हा सिनेमा रिलीज झाला. यामध्ये करीना कपूर खान, तब्बू, क्रिती सेनन यांनी एअर हॉस्टेसची भूमिका साकारली आहे. सस्पेन्स, थ्रिलर, कॉमेडी असा एकंदर फुल एंटरटेनिंग असा हा सिनेमा आहे. तसंच तीन अभिनेत्रींनी एकत्र सिनेमात काम करणं हेही आश्चर्यच आहे. या सिनेमात एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही भूमिका साकारली आहे. तिच्या भूमिकेनेही प्रेक्षकांनी खळखळून हसवलं आहे.

राजेश कृष्णन दिग्दर्शित 'क्रू' सिनेमा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. एकता कपूरने सिनेमाची निर्मिती केली आहे. करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेननने सिनेमात ग्लॅमर आणि कॉमेडीचा तडका लावला आहे. तिघीही एअर हॉस्टेस आहेत. विमान प्रवासात त्यांच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू होतो. त्याचा मृतदेह उचलताना या तिघींना त्याच्या खिशात सोन्याची बिस्कीटं मिळतात. मग खरी मजा सुरु होते. दरम्यान सिनेमात कस्टम डिपार्टमेंटमध्ये एका एअरपोर्ट अधिकारीची भूमिका एका मराठी अभिनेत्रीने साकारली आहे. ती अभिनेत्री आहे तृप्ती खामकर (Trupti Khamkar). तृप्तीने तिच्या अकाऊंटवर सिनेमातील तिचा व्हिडिओही पोस्ट केलाय. यामध्ये ती तावातावात येत करीना, तब्बू आणि क्रितीला 'सोनं कुठे आहे?' असा जाब विचारताना दिसते. 

तृप्तीच्या भूमिकेनेही सिनेमात जाम मजा आणली आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या ट्रेलरवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. तृप्तीने सिनेमात छोटी नाही तर महत्वाची भूमिका साकारली आहे. शिवाय दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा यांनीही कॅमिओ केला आहे. 

तृप्ती खामकरचा हा पहिला हिंदी सिनेमा नाही. याआधी तिने विकी कौशलच्या 'गोविंदा नाम मेरा' मध्येही काम केले होते. शिवाय ती 'झोंबिवली' या मराठी सिनेमातही झळकली.

टॅग्स :मराठी अभिनेताबॉलिवूडकरिना कपूरतब्बूक्रिती सनॉन