मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणजे उर्मिला निंबाळकर. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या उर्मिलाने अलिकडेच एका गोड बाळाला जन्म दिला आहे. मात्र, एका चिमुकल्या बाळाचं संगोपन करण्यासोबतच ती तिच्या करिअरची गाडीही तितक्याच लिलया पद्धतीने सांभाळत आहे. त्यामुळे अनेकदा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. तर, काही वेळा काही जण तिला ट्रोलही करतात. मात्र, या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत उर्मिला तिचं काम करत असते. यामध्येच तिने एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या नवऱ्याचं कौतुक केलं आहे.
"त्याला लाज नाही वाटत, बाळाला पोटाशी बांधून फिरायला न्यायची.बघतात फिरताना लोक नजर रोखून, बिघडलीय आत्ताची पिढी, असंही मनात म्हणत असतील. पण बाळाचे लंगोट बदलण्यापासून, ते माझ्या शुटिंगच्या दरम्यान, त्याला संपूर्णपणे सांभाळण्यापर्यंत @sukirtgumaste सगळं मनापासून आनंदाने करत असतो. आणि हे सगळं स्वतःचं उत्तमरित्या करिअर सांभाळून! जेव्हा आयुष्याचा जोडीदार असं म्हणलं जातं, तेव्हा बाळ सांभाळण्याची जबाबदारी मात्र फक्त स्त्रीवर येऊन पडते. दूधासाठी बाळाला आईच हवी पण इतर सर्व कामे, पुरुष उत्तम करु शकतात, ज्यांनं स्त्रीला पुरेशी विश्रांतीही मिळते आणि तिच्या करिअरकडे तिला लक्ष देण्यासाठी थोडी उसंतही",असं उर्मिलाने म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "मी आणि सुकीर्त एका प्रायोगिक नटकाच्या संस्थेत भेटलो, तेव्हाही तो स्रीयांच्या प्रश्नाकडे अतिशय कळकळीने, आदराने पहायचा. लग्न झाल्यानंतरही उचित ठिकाणी त्यानं स्वतःच्या आयुष्यातील प्रत्त्येक स्त्रीची बाजू घेतली. त्याच्या आईची बाजू, सहकारी, मी, माझी आई, मैत्रीण सर्वांचं म्हणणं अतिशय empathetically त्याला समजून घेतां येतं. जेव्हा बाळ झालं तेव्हाही पठ्ठ्यानं साथ सोडली नाही. हे पुरुषाचं खरं पुरुषत्व आहे."
दरम्यान, उर्मिलाची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत असते. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती प्रसिद्ध युट्युबरदेखील आहे. यात ती प्रत्येक आठवड्याला मेकअप, ट्रॅव्हल, स्कीनकेअर अशा अनेक विषयांवर व्हिडीओ शेअर करत असते.